देवस्थानांसह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांच्या संपत्तीचे राष्ट्रीयीकरण करावे : कृषिमंत्री दादा भुसे यांना जिजाऊ ब्रिगेडचे निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५

देवस्थानांसह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांच्या संपत्तीचे राष्ट्रीयीकरण करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन कृषी मंत्री दादा भुसे यांना जिजाऊ ब्रिगेडतर्फे मालेगाव येथे देण्यात आले. राज्यात सर्व धर्मीय मंदिर प्रार्थना स्थळ यांचे राष्ट्रीयीकरण व्हावे या मागणीसाठी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथील अंबिका देवीच्या मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. जिजाऊ ब्रिगेडतर्फे राज्यभर आंदोलन सुरू असून या पार्श्वभूमीवर जिजाऊ ब्रिगेड नाशिक जिल्हाध्यक्ष इंजि. शिल्पा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी मालेगाव येथे दादा भुसे आले असता त्यांची भेट घेत निवेदन दिले.

यावेळी चर्चा करतांना शिल्पा देशमुख म्हणाल्या की कोरोना संसर्गामुळे महाराष्ट्र राज्यासह देशभरात बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. देशावर कर्जाचा मोठा डोंगर झाला आहे. आर्थिक आणीबाणीमुळे संकटाची स्थिती निर्माण झाली आहे. विकास कामांना निधी नाही. त्यामुळे विकास कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह देशाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत मंदिरांसह विविध सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांमध्ये भाविकांनी देणगी दिलेला कोट्यवधी रुपयांचा पैसा शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात यावा.हा निधी विकास कामांसाठी वापरण्यात यावा. यामुळे देशावरील कर्जाचा डोंगर कमी होईल असे म्हणत निवेदन दिले. जिजाऊ ब्रिगेड नाशिक जिल्हाध्यक्ष इंजि. शिल्पा देशमुख यांच्यासह सुरेखा शर्मा, नीता मुंदडा, रजनी सोनवणे, निकिता अमीन, नेहा हेडा, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रतीक्षा भोसले, सरला पाटील, प्रसिद्धी प्रमुख सुचेता सोनवणे, रत्ना देवरे, शोभा बच्छाव, विजयालक्ष्मी अहिरे यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी व सदस्य उपस्थित होत्या.

सर्वधर्मीय नागरिक श्रद्धेतुन मोठ्या प्रमाणावर मंदिर तसेच प्रार्थना स्थळांना देणगी देतात. मात्र मोठमोठ्या मंदिरांचे तसेच प्रार्थना स्थळांचे ट्रस्टी या संपत्तीचा उपयोग स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी करतात. सर्व मंदिर किंवा प्रार्थना स्थळांना शासनाने ताब्यात घ्यावे. सर्वधर्मीय मंदिर तसेच प्रार्थना स्थळांमधील प्रत्येक पैशाचा हिशोब जनतेला द्यावा. देशातील ही सर्व संपत्ती सरकारजमा झाल्यास सध्या देशावर असलेला कर्जाचा डोंगर काढता येईल. देशाच्या  विकासासाठी याचा उपयोग करता येईल. कोल्हापूर येथील अंबिका देवी येथून सुरू झालेला लढा मागण्या पूर्ण होईपर्यंत जिजाऊ ब्रिगेड असाच सुरू ठेवणार आहे.
- माधुरी भदाणे, प्रदेशाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र
देशभरातील मंदिरांत दररोज जमा होणाऱ्या कोट्यवधी रुपयांवर व दागदागिण्यांवर डल्ला मारण्यासाठीच पुजाऱ्यांनी देवस्थानांचा ताबा घेतला आहे. श्रद्धाळू भाविक प्रचंड प्रमाणावर देणगी स्वरुपात मंदिरांमध्ये रक्कम दान करतात. परंतु या संपत्तीचा उपयोग पूरग्रस्त, आपत्ती ग्रस्त, दुष्काळी भागात किंवा देशाच्या संपत्तीत हा पैसा विकास कामांसाठी सरकारी तिजोरीत जमा होणे अपेक्षित असताना मंदिर प्रशासनासाठी मात्र हा धंदा झाला आहे. त्यामुळे या सर्व देवस्थानांसह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे पुजाऱ्यांच्या आणि ट्रस्टींच्या तावडीतून मुक्त करा या मागणीसाठी आम्ही आज निवेदन दिले आहे.
- इंजि. शिल्पा देशमुख, जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड नाशिक

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!