भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी मतदारसंघाची पहिली निवडणूक १९५७ साली पार पडली. या स्वतंत्र मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून निवडून येण्याचा बहुमान कम्युनिष्ठ पक्षाचे पुंजाबाबा गोवर्धने यांनी प्राप्त केला. शेतमालाला काळ्या बाजाराच्या विळख्यातून सोडविण्यासाठी भाताचा लढा उभारून पुंजाबाबांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला अग्रक्रम देण्याचा प्रयत्न केला. निस्पृह व्यक्तिमत्व असलेल्या पुंजाबाबा यांचा प्रभाव १९६२ च्या निवडणुकी पर्यंत टिकून होता. या मतदारसंघात जातीयवादाने आपला प्रभाव दाखविण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला. परंतु त्याला फारसे यश मिळू शकले नाही. ही बाब थेट १९६२ पासून वेळोवेळी स्पष्ट झालेली आहे. १९६२ मध्ये काँग्रेसने मुलचंदभाई गोठी यांना उमेदवारी बहाल केली. त्यांची लढत भारतीय कम्युनिष्ठ पक्षाचे ॲड. छबाजी खातळे यांच्याशी झाली. जातीयवादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या निवडणुकीत गोठी यांनी विजयश्री प्राप्त केली. मात्र त्यांना लाभाचे पद उपभोगले ह्या मुद्यावर अपात्र ठरविण्यात आले. १९६७ पासून हा मतदारसंघ आदिवासीसाठी आरक्षित झाल्यामुळे गोठी यांना प्रत्यक्ष रिंगणात उतरण्याची संधी मिळाली नसली तरी त्यांचा राजकीय ‘किंगमेकर’म्हणून प्रभाव अखेरपर्यंत टिकून राहिला. प्रारंभीपासूनच काँग्रेस पक्षाने या मतदारसंघावर आपला प्रभाव प्रस्थापित केला तो १९८० पर्यंत टिकला. १९६७ मध्ये काँग्रेसने शंकरराव गणपत चावरे यांना निवडणूक रिंगणात उतरवले. त्यांच्या विरोधात भारतीय कम्युनिष्ठ पक्षाचे एल. के. बोंबले यांनी लढत दिली मात्र गोठी यांच्या पाठबळावर चावरे यांनी सहज विजय प्राप्त केला.
१९७२ मध्ये काँग्रेसने आपली उमेदवार बदलाची परंपरा कायम राखत विठ्ठलराव गणपत धारे यांना निवडणूक रिंगणात उतरविले. आदिवासी समाजातील सुशिक्षित व अभ्यासू अशी प्रतिमा असणाऱ्या घारे यांनी भारतीय क्रांती दलाचे भाऊ सकरू वाघ यांचा पराभव केला. या पराभवाचे उट्टे वाघ यांनी नंतर पाच वर्षांनी काढले. १९७८ मध्ये काँग्रेसने घारे यांना उमेदवारी नाकारत गत निवडणुकीत त्यांच्याच विरोधात दंड थोपटणाऱ्या भाऊ सक्रू वाघ यांना रिंगणात उतरविले. वाघ यांनी जनता दलाचे माधवराव सखाराम डामसे यांचा पराभव करीत विजयश्री प्राप्त केली. १९८० मध्ये काँग्रेसने बाघ यांना उमेदवारी नाकारत घारे यांना ती बहाल केली. विशेष म्हणजे यावेळी वाघ यांनी बंडखोरी करीत अर्स काँग्रेसकडून नशीब अजमावून पाहिले. डामसेही जनता पार्टीकडून रिंगणात उतरले. घारे यांनी वाघ व डामसे यांचा पराभव करीत विजयश्री प्राप्त करतानाच करतानाच दोनदा विधानसभेत प्रवेश करण्याचा बहुमानही मिळवला. १९८५ साली शरद पवार यांनी पुलोद आघाडीचा प्रयोग केला. त्यांचे स्नेही गोठी यांनी इगतपुरी विधानसभेची जागा प्रतिष्ठेची केली. भारतीय जनता पक्षाचे शिवराम झोले यांना अर्स काँग्रेसची (पुलोद) उमेदवारी मिळवून देत त्यांना विजयी करण्यात मूळचंदभाईंचे योगदान महत्त्वाचे ठरले. १९९० पासून या मतदारसंघातील काँग्रेसचा प्रभाव झपाट्याने ओसरू लागला. इगतपुरी तालुक्यात भाजपाचा प्रभाव वाढला. १९९० मध्ये भाजपा प्रथमच निवडणुकीच्या आखाड्यात उतरली. या पक्षाने यादवराव बांबळे यांना उमेदवारी दिली. त्यांचा सामना अर्स काँग्रेसचे भाऊ सक्रू वाघ व जनता पार्टीचे माधवराव डामसे यांच्याशी झाला. गोठी यांनी पाठराखण केल्यामुळे बांबळे यांनी वाघ व डामसे यांच्यावर मात केली. शिवसेना-भाजपाचा वाढता प्रभाव व काँग्रेसमधील गटबाजी बांबळे यांच्या पथ्यावर पडली. पुढे निवडणुकीच्या तोंडावर यादवरावांनी भाजपाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
१९९५ च्या निवडणुकीत विठ्ठलराव घारे यांना काँग्रेसचे अधिकृत तिकीट मिळाले होते; परंतु निवडणुकीचा सरकारी हिशोब न चुकवल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला. काँग्रेसने शिवराम झोले यांना उमेदवारी दिली. झोले यांची लढत शेकापचे पांडुरंग बाबा गांगड, शिवसेनेचे पांडुरंग शंकर झोले व अपक्ष यादवराव बांबळे यांच्याशी झाली. या साऱ्यांवर मात करीत झोले यांनी विधानसभेचे दोनदा प्रतिनिधित्व करण्याचा मानही मिळवला. शेकापकडून १९९५ मध्ये रिंगणात उतरणाऱ्या गांगड यांनी त्यानंतरच्या निवडणुकीत शेकापची साथ सोडली आणि शिवसेनेशी घरोबा केला. १९९९च्या निवडणुकीत शिवसेनेकडून रिंगणात उतरलेल्या गांगड यांनी ठाकूर समाजाचे संघटन व सेना-भाजपाची बांधणी या भांडवलावर काँग्रेसचे वसंत डामसे व राष्ट्रवादीचे शिवराम झोले यांचा पराभव केला. २००४ च्या निवडणुकीत शिवसेनेने गांगड यांना उमेदवारी नाकारली. कम्युनिस्ट पक्षाचे काशीनाथ मेंगाळ यांना उमेदवारी देण्यात आली; परंतु आमदार झाल्यावर राजकीय महत्त्वाकांक्षी असलेल्या मेंगाळांनी आपले स्वतंत्र वर्चस्व निर्माण केले. २००९ ला मेंगाळ यांची उमेदवारी कापण्याची योजना समजताच मेंगाळ यांनी मनसेची वाट धरली. याचवर्षी निर्मला गावित यांना गोपाळराव गुळवे यांनी काँग्रेसतर्फे रिंगणात उतरवून निवडून आणले. २०१४ ला त्यांनीच पुन्हा काँग्रेसचे तिकीट पुन्हा मिळवत दुसऱ्यांदा आमदारकी मिळवली. शिवराम झोले ह्यांचा त्यांनी पराभव केला होता. २०१९ ला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश करून तिकीट मिळवले. अचानक हिरामण खोसकर राष्ट्रवादीतुन काँग्रेसमध्ये आले. त्यांना काँग्रेसने तिकीट दिले. गावित यांचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले. अखेर हिरामण खोसकर यांनी आमदारकी प्राप्त केली. यावर्षी २०२४ ला विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनी कॉग्रेस सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. या निवडणुकीत नेमके काय घडणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अजूनही मतदारसंघाबाबत अनेक रंजक माहिती असून पुढील भागात प्रकाशित होईल.