अवकाळीने इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान : आचारसंहितेचा बाऊ न करता प्रशासनाने तात्काळ मदत द्यावी : पांडुरंग वारुंगसे

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्याने भात पीक दमदार आले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून संततधारेसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे भातावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे. यातच शनिवारी सायंकाळी अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीत सापडली आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या भात शेतीबरोबरच सोयाबीन, उडिदाचे नुकसान झाले आहे. यंदा भातशेती जोमात असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु सोंगणीवर आलेल्या भात शेतीवर अवकाळी पावसाने संकट आणले हवं. ह्या पावसामुळे इगतपुरी तालुक्याच्या सर्व गावांतील भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. भातासह, उडीद, सोयाबीन, वरई, खुरासनी आदी पिके धोक्यात आली आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने ह्याचा बाऊ न करता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी इगतपुरी तालुका प्रशासनाने कार्यवाही करावी, ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये चालढकल न करता संबंधित विमा कंपनीने नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी सत्वर काम करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इगतपुरी तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे, जिल्हा नेते वसंत भोसले यांनी केली आहे.

Similar Posts

error: Content is protected !!