इगतपुरीनामा न्यूज – पिंप्री सदो ता. इगतपुरी येथील जि. प. ऊर्दु शाळेतील सहा वर्गांचा एकशिक्षकी कारभार आणि इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, विस्ताराधिकारी अशोक मुंढे यांच्या एकतर्फी कारभाराविरोधात मुस्लिम विद्यार्थी शिक्षणमंत्र्यांकडे गाऱ्हाणे मांडायला रेल्वेने निघाले. विद्यार्थ्यांची आणि पालकांची समजूत घालता घालता या अधिकाऱ्यांची त्रेधातिरपिट उडाली. गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्याशी बोलणे सुरु असतांना विस्ताराधिकारी अशोक मुंढे मध्येच सहभागी होऊन कायद्याची “गुंडे” भाषा बोलायला लागले. परिणामी पालकांनीही संतापलेली भाषा वापरत त्यांना गप्प केले. युद्धपातळीवर शिक्षक उपलब्ध करून हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी हतबल शिक्षण विभागाने पालक आणि विद्यार्थ्यांना लेखी आश्वासन दिले. हे सगळे वगनाट्य निर्माण करायला कारणीभूत असणारे गटशिक्षणाधिकारी आणि विस्ताराधिकारी सकाळपासून विद्यार्थी आणि पालकांची समजूत घालता घालता घामाघूम झाले होते. लेखी आश्वासनाचे पालन न केल्यास यापेक्षा कठोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. पिंप्री सदोच्या उर्दू शाळेला सहा वर्गांना एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीमुळे उपसरपंच फिरोज शेख, राष्ट्रवादीचे शाखाध्यक्ष अमजद पटेल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नर्गिस पटेल, उपाध्यक्ष अब्बास पटेल, जामा मस्जिद ट्रस्टी मतीन पठाण, इम्तियाज पटेल, शहानवाज पटेल, आयाज पठाण, रफिक पटेल, मुबिन खान, राहील पटेल, अमन पठाण, अयान पटेल यांनी टाळे ठोकून आंदोलन केले होते. इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, विस्ताराधिकारी अशोक मुंढे यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज हे विद्यार्थी शिक्षण मंत्र्यांकडे गाऱ्हाणे मांडण्यासाठी निघाले होते.
व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी क्लिक करा https://youtu.be/cR7IXXLDL1E?si=1DPBJqRSE43LXh6d