वाहतुकीचा खेळखंडोबा – पिंपळगाव टोल प्रशासन, महामार्ग विभागाचे अधिकारी, वाहतूक पोलीस यंत्रणा आणि ठेकेदाराच्या ४२ पिढ्यांचा होतोय उद्धार : जबाबदार अधिकाऱ्यांच्या तोंडाला उद्या शिवसैनिक काळे फासणार – शिवसेना तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे यांचा इशारा

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकपासून वाडीवऱ्हे गोंदे पर्यंत वाहतुक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. १५ मिनिटांच्या प्रवासासाठी दोन ते चार तास लागत आहेत. लहान मोठी वाहने, मोटारसायकली चांगलीच अडकून बसत असल्याने वाहतूकीची प्रचंड कोंडी होत आहे. महामार्गावर काम करणाऱ्या ठेकेदारांनी कोणत्याही प्रकारचे व्यवस्थापन केलेले नसल्याने हा प्रश्न गंभीर बनला आहे. याच कारणांनी अपघातही घडत असल्याचे दिसते. रुग्णवाहीका आणि गरोदर महिलांचे अभूतपूर्व हाल होत आहेत. लोकांच्या संतापाचा अतिरेक झाला असून पिंपळगाव टोल प्रशासन, महामार्ग विभागाचे अधिकारी, वाहतूक पोलीस यंत्रणा आणि काम करणाऱ्या ठेकेदाराच्या ४२ पिढ्यांचा उद्धार लोकांकडून केला जात आहे. वाहतूक कोंडीचा विषय दररोज गंभीर बनत चालला आहे. तातडीने यावर उद्या परिणामकारक उपाययोजना न केल्यास महामार्ग विभागाचे अधिकारी, पिंपळगाव टोल अधिकारी आणि ठेकेदार यांच्या तोंडाला काळे फासून संताप व्यक्त करणार असल्याचा इशारा शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे यांनी दिला आहे. मागील आठवड्यात याप्रकरणी रास्तारोको करण्याचा इशारा काम करण्याचा शब्द दिल्याने मागे घेतला होता. मात्र लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अघोरी प्रकार सुरूच असल्याने उद्या संबंधित सर्वांच्या तोंडाला आमचे शिवसैनिक काळे फासणार आहे अशी संतप्त भूमिका राजाभाऊ नाठे यांनी यावेळी व्यक्त केली. 

महामार्गावर विल्होळी ते व्हीटीसी फाटा येथे वाहतूक कोंडी हा रोजचा प्रश्न बनल्याने वाहनचालक प्रचंड वैतागले आहेत. जिल्ह्यातील मंत्री आणि रोज प्रवास करणारे लोकप्रतिनिधी यावर काहीही बोलायला तयार नाही. सरळ मार्गाने वाहतूक समस्येतून लवकर सुटका होण्याची शक्यता दिसत नाही. वाहतूक कोंडीचा रोजच नवीन विक्रम तयार होत आहे. वाहतूक कोंडीमुळे एखादी रुग्णवाहिका आली तर तिला पुढे जाताच येत नाही. लाडक्या बहिणींच्या गरोदरपणात त्यांना आवश्यक उपचार यामुळे मिळत नाही. यावर संबंधित सर्वांच्या तोंडाला काळे फासण्याशिवाय अजिबात पर्याय उरला नाही. यामुळे उद्या दिवसभरात नाशिक महामार्ग अधिकारी कार्यालय, पिंपळगाव टोलनाका कार्यालयात जाऊन सर्वांच्या तोंडाला शिवसैनिक काळे फासतील असेही तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे यांनी आक्रमकपणे सांगितले. दरम्यान राजाभाऊ नाठे यांच्या भूमिकेला विल्होळी ते गोंदे परिसरातील जागरूक नागरिकांनी सक्रिय पाठिंबा दिला असून तेही आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!