इगतपुरीनामा न्यूज – सर्वच सैनिक भारत देशाचे रक्षण करण्यासाठी आपले घर आणि कुटुंब सोडतात. जबाबदारीमुळे त्यांना भावा बहिणींचा रक्षाबंधन हा पवित्र सण सैनिकांना साजरा करता येत नाही. रक्षाबंधन सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र सैनिकांना रक्षाबंधनाच्या सणाचा आनंद घेता येत नाही. सणाच्या दिवशी त्याला त्याची बहीण आणि कुटुंबाची खूप आठवण येते. हे ओळखून इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथील माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींनी नाशिक येथील आर्टिलरी सेंटर वडनेर गेट येथे जाऊन रक्षाबंधनाचा सण सैनिकांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला. सैनिकांचे औक्षण करून त्यांना गोड पदार्थ भरवण्यात आला. राख्या बांधल्याबद्दल सैनिकांनी विद्यार्थिनी आणि शिक्षकांचे आभार मानले. विद्यालयातील शिक्षकांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. सालाबादप्रमाणे याही वर्षी विद्यालयातील विद्यार्थिनींनी सैनिकांसोबत रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केल्याने पालकांनी सर्वांचे कौतुक केले. यावेळी येथील विद्यार्थिनींनी वस्तू संग्रहालयाला भेट देऊन युद्धात वापरलेले सर्व साहित्याची पाहणी केली. युद्धातील प्रसंग पाहून विद्यार्थिनी चकित झाल्या. विद्यार्थिनी आणि शिक्षकांना यावेळी कारगिल युद्धावर आधारित थ्रीडी चित्रपट दाखवण्यात आला.