६ वर्गाला एकच शिक्षक ; शिक्षक मिळण्यासाठी शेळ्या घेऊन विद्यार्थी इगतपुरीत धडकणार : शिक्षक न मिळाल्यास शेळ्या वळण्याची परवानगी द्या : एल्गार कष्टकरी संघटनेचा आंदोलनाला पाठिंबा

इगतपुरीनामा न्यूज – पिंप्री सदो, ता. इगतपुरी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये पहिली ते सहावीच्या वर्गासाठी एकमेव शिक्षक आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. या सहा वर्गांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आल्यामुळे पालकांनी इगतपुरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे वारंवार प्रयत्न करूनही शिक्षक उपलब्ध होत नाही. ह्यामुळे येथील पालक संतप्त भूमिका घेत आहेत. उद्या ८ जुलैला सकाळी १० वाजता शाळेला कुलूप लावण्यात येणार असल्याचे पालकांनी सांगितले. यानंतर ह्या शाळेतील सर्व विद्यार्थी शेळ्या घेऊन इगतपुरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात पायी प्रवास करून जाणार आहेत. तातडीने शिक्षक उपलब्ध करावेत अन्यथा जंगलात शेळ्या वळण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी पालकांसह ठिय्या आंदोलन करून करण्यात येणार आहे. ह्या अनोख्या आंदोलनाला एल्गार कष्टकरी संघटनेने सक्रिय पाठिंबा घोषित केला असून विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आंदोलनात संघटना सहभागी होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी दिली. शिक्षणाचा आम्हाला अधिकार आहे. पण आमच्या सहा वर्गाला एकच शिक्षक देऊन आम्हाला या अधिकारापासून का वंचित ठेवत आहेत? असा सवाल चिमुकल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींनी केला आहे. याप्रकरणी इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी सांगितले की, ह्या शाळेत शुक्रवारी शिक्षकाची व्यवस्था केली आहे. सूचना दिल्यानुसार शिक्षक शाळेत येणार आहेत. संबंधित शिक्षक तिकडे गेले नाही तर त्यांच्यावर वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केला म्हणून कारवाई केली जाईल. पालकांनी मात्र शनिवारपर्यंत कोणीही शिक्षक शाळेत उपस्थित झाले नसल्याचे कळवले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!