३ जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी सरपंचांची आवळी दुमाला येथे क्षेत्रभेट : विविध योजना व अभियानाची माहिती घेत घेतला ग्रामविकासाचा मुलमंत्र

इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान, ‘यशदा’च्या संयुक्त विद्यमाने सरपंच उजळणी प्रशिक्षण मित्रा नाशिक येथे संपन्न झाले. ह्या प्रशिक्षणात नव्याने विकसित होणाऱ्या गावाचा अभ्यास करण्यासाठी एका गावाच्या क्षेत्रभेटीद्वारे गावातील सर्व योजना व अभियानाची माहिती देण्यात येते. यानुसार नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ६० प्रशिक्षणार्थी सरपंच यांनी आवळी दुमाला गावात भेट दिली. सरपंच लता श्रीरंग भले, उपसरपंच शैला रामदास जमधडे, ग्रामसेवक हनुमान दराडे यांनी प्रत्येकाला केशर आंब्याचे रोपटे देवुन स्वागत केले. शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत नागरी आणि ग्रामीण क्षेत्रांसाठी राबविण्यात येणारा अनोखा एकात्मिक असा माझी वसुंधरा अभियान हा उपक्रम आहे. यामध्ये नैसर्गिक परिसंस्थांचे जतन व संरक्षण करण्यासाठीच्या विविध उपायांची अंमलबजावणी करणे, वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक कृती उपक्रमांवर नागरिकांच्या सहभागास प्रोत्साहित करणे या बाबी समाविष्ट केल्या आहेत. या अभियानाची रचना कार्बन सीक्वेस्ट्रेशन, हरित वायूचे उत्सर्जन कमी करणे आणि नागरिकांमध्ये शाश्वत जीवनशैलीचा प्रचार करणे या वातावरणीय बदलाच्या तीन महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी करण्यात आली आहे. माझी वसुंधरा अभियान निसर्गाच्या भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश यावर काम करते. या पाच घटकाबाबत उपस्थितांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. 

उपक्रमाच्या माहितीसाठी संकेतस्थळाला भेट देऊन माहिती जाणुन घेण्याबाबत सांगण्यात आले. शाश्वत विकास उद्दिष्टे, भुमी तत्व अंतर्गत हरित आच्छादन आणि जैवविविधता, घनकचरा व्यवस्थापन, माझी वसुंधरा अभियानाची जनजागृती करणे, तरुणांचा सहभाग आणि पर्यावरण दूतांची निवड, सार्वजनिक ठिकाणी माझी वसुंधरा तत्त्वे दर्शवणाऱ्या बाबींच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसिध्दी, बचत गटांचा सहभाग, पर्यायी निधी मिळवण्याचे मार्ग, सामुदायिक सहभाग व इतर निधी, पर्यावरण सेवा योजनेत शाळांचा सहभाग, महाराष्ट्र युथ फॉर क्लायमेट ऍक्शन (MYCA) उपक्रमाद्वारे हवामान बदलाबाबत तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करणेबाबत प्रशिक्षण घेणाऱ्या सरपंचांनी माहिती घेतली. कार्यक्रमावेळी आवळी दुमाला येथील रामदास जमधडे, कुंडलिक जमधडे, निवृत्ती जमधडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य  आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आम्हीही आमच्या गावात आवळी दुमाला गावासारखेच पर्यावरण पूरक काम करणार असल्याची शपथ उपस्थित प्रशिक्षणार्थी सरपंच यांनी घेतली.

Similar Posts

error: Content is protected !!