इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
तापमानात होत असलेली वाढ, बदललेले निसर्गचक्र अनियमित पर्जन्यमान, अतिवृष्टी आणि दुष्काळ या माध्यमातून निसर्ग प्रत्येकाला अस्तित्वाची जाणीव करून देत आहे. पर्यावरणाचे असंतुलन वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वृक्ष लागवड करणे काळाजी गरज असल्याचे इगतपुरीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी सांगितले. इगतपुरी तालुक्यात ५० हेक्टर क्षेत्रात वन महोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले. चिंचलेखैरे येथे झालेल्या कार्यक्रमाला इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड उपस्थित होत्या. यावेळी वृक्ष दिंडी काढून जनजागृती करण्यात आली.
शासनाच्या महत्वपूर्ण मोहिमे अंतर्गत इगतपुरी तालुक्यात पहिल्या टप्प्यात विविध प्रजातींची मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली आहे. पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. यासाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक स्तरातील सर्वच व्यक्तींनी सहभाग नोंदवला.
- भाऊसाहेब राव, वनपरिमंडळ अधिकारी
इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत परिसर, शाळा, पशुवैद्यकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाव, तीर्थक्षेत्र या ठिकाणी झाडांच्या लागवडीला प्रामुख्याने प्राधान्य देण्यात आले असल्याचे भंडारदरावाडीचे वनपरिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव यांनी सांगितले. या महोत्सवा निमित्त इगतपुरीच्या वनविभागाला १ लाख ४१ हजाराचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात १ लाख २० हजाराचे उद्दिष्ट्य वनविभागाने पूर्ण केले आहे. सर्वतीर्थ टाकेद परिसरात ३० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. चिंचलेखैरे येथे ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना आंब्याची रोपटे वाटप करण्यात आली. यावेळी गिन्नी गवत, डोंगरी हेमाटा आदी प्रजातींची लागवड करण्यात आली. वृक्ष लागवडीच्या मोहिमे अंतर्गत स्थानिक मजुरांना सुद्धा रोजगार मिळाला. वृक्ष लागवड अभियान यशस्वी करण्यासाठी वन परिमंडळ अधिकारी पी. के. डांगे, एस. ए. झुटे, सचिन दिवाने, वनरक्षक सुरेखा गुहाडे, वनरक्षक फैजअली सय्यद, गांगुर्डे, जाधव, मनीषा सोनवणे, रेश्मा पाठक, मालती पाडवी, स्वाती लोखंडे, मंगला धादवड, कल्पना पाटील, विठ्ठल गावंडे, चिंतामण गाडर, कैलास पोटींदे, मंदा पवार, एस. पी. थोरात, गोरख बागुल, राहुल घाटेसाव, आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी ग्रामस्थ विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.