कृषी विभागामार्फत इगतपुरी तालुक्यात भात, नागली, वरईचे प्रकल्प राबवणार – तालुका कृषी अधिकारी रामदास मडके

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात कृषी विभागामार्फत खरीप हंगामात भात, नागली, वरई या पिकांचे प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना या प्रात्याक्षिकासाठी भाताचे तिलक, नागलीचे फुले कासारी तर वरईचे एकादशी वाण उपलब्ध करून देण्यात आले आहे असजी माहिती इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, कृषी पर्यवेक्षक किशोर भरते यांनी दिली. इगतपुरी तालुका हा भात पिकाचा आगार म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील शेतकरी भात पिकात उत्पन्न वाढीसाठी निरनिराळे प्रयोग करत असतात. कृषी विभागाची मदत देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शनाच्या माध्यमातून होत असते.

निरपण येथील आदिवासी पाड्यावर शेतकऱ्यांना वरई पिकाच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी कृषी पर्यवेक्षक किशोर भरते, कृषी सहाय्यक मोहिनी चावरा, शांताराम गभाले आणि शेतकरी उपस्थित होते. कृषी विभागाकडून भातात चार सुत्री पद्धतीचा वापर करण्याबाबत सतत प्रचार, प्रसार करण्यात येतो. या खरीप हंगामात कृषी विभागाकडून भात पिकात सुधारित तंत्रज्ञानावर आधारित पीक प्रात्यक्षिके राबविण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने श्री पद्धतीवर आधारित ५० हे.,ओळीत पुनर्लागवड १० हे., यांत्रिक पद्धतीने १० हे. अशा प्रकारे प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत. अन्न आणि पोषण सुरक्षा पौष्टिक तृणधान्य अंतर्गत नागली पिकाचे १४० हे. आणि वरई पिकाचे २०० हे. क्षेत्रावर प्रात्यक्षिके राबवण्यात येणार आहेत. इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पन्न वाढवावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, कृषी पर्यवेक्षक किशोर भरते यांनी केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!