इगतपुरीनामा न्यूज : राष्ट्रीय स्कूल डेव्हलपमेंट अँड प्रमोशन फेडरेशन ऑफ इंडिया आणि डॉ. निलेश राणे युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने मातोश्री मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल येथे सहाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सात ते नऊ जून या कालावधीसाठी या स्पर्धा आयोजित करण्यात आले असून आयकर आयुक्त डॉ. रविराज खोगरे आणि नाशिक ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. आयआयएफएल फाउंडेशनच्या डॉ. चेतना खोगरे आणि निलेश राणे युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. निलेश मधुकर राणे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या क्रीडा स्पर्धेसाठी 500 हून अधिक खेळाडूंची उपस्थिती ही लक्षणीय आहे. यादरम्यान खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल, बॅडमिंटन, फुटबॉल, अथलेटिक्स या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कनिष्ठ व वरिष्ठ गटातून खेळाडूंना विविध खेळ प्रकारात आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे.
सदर कार्यक्रमास स्कूल डेव्हलपमेंट अँड प्रमोशन फेडरेशन(SDPF) ऑफ इंडियाचे विविध राज्यातील पदाधिकारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित सर्वांचे स्वागत डॉ. निलेश राणे यांनी केले.
पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी पुढीलप्रमाणे स्थान प्राप्त केले.
- कब्बडी ज्युनिअर – महाराष्ट्र सुवर्ण पदक तर ओडिशा रजत पदक
- बॅडमिंटन – ज्युनिअर गर्ल्स सिंगल – रजत पदक, सिनियर गर्ल्स डबल्स – सुवर्ण पदक प्राप्त
- बॉईज under 19 डबल्स – सुवर्ण पदक, under 17 डबल्स – सुवर्ण पदक, under 17 सिंगलस् कांस्य पदक.
देशभरातून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, ओडिशा, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड, विदर्भ, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड इत्यादी राज्यातील खेळाडू या 3 दिवसांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी उपस्थित आहेत.
ही क्रीडा स्पर्धा एका 8 वर्षांच्या विद्यार्थीनीमुळे देखील चर्चेचा विषय ठरली कारण पिंपरदा फलटण येथून आलेली सई भगत हिने 100 मीटर अथेलेटिक्स प्रकारात अतिशय उत्तम कामगिरी बजावली. वयाच्या साडे सहा वर्षांपासून धावणारी सई ही 5 किलोमिटर न थांबता धावणारी सर्वात लहान अथेलेटिक्स म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधे तिची दखल घेतली जाणार आहे.
या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या नियोजनात डॉ. निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली राजेंद्र गाढे, केतन निकम, राहुल पवार, शुभम सांगळे, प्रितेश काळे, ऋषिकेश दवंगे, निखिल लोखंडे यांच्या नियोजन समितीने काम केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इगतपुरी येथील जिल्हा परिषद शिक्षिका आणि इराया फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष आरती बोराडे यांनी केले.