शेकडो श्वासांना वाचवण्यासाठी धर्मादाय अधिकाऱ्यांचा पुढाकार ; त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून एक कोटींचा ऑक्सिजन प्रकल्प

इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
कोरोनाच्या रुग्णसेवेसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला कटिबद्ध आणि कार्यक्षम होण्याचे मौलिक मार्गदर्शन करणाऱ्या देवस्वरूप अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याने त्र्यंबकराजाच्या भाविकांची छाती अभिमानाने फुलली आहे. महाराष्ट्राचे धर्मादाय आयुक्त प्रमोदराव तरारे याचे नियमित सहकार्य आणि धर्मादाय सहआयुक्त जयसिंगराव झपाटे यांच्या मार्गदर्शनाने १ कोटी खर्चाचा ऑक्सिजन निर्मित करणारा प्रकल्प लवकरच सेवेत रुजू होणार आहे. गुदमरणाऱ्या अनेक श्वासांना जीवदान देणाऱ्या ह्या प्रकल्पामुळे हजारो कोरोना बाधितांना जणू त्र्यंबकराजांचा आशीर्वाद लाभल्याचे मानले जात आहे. हवेतून निर्माण होणारा ऑक्सिजन संकलित करून अत्यावश्यकता असणाऱ्या रुग्णांना वाचवण्यासाठी त्र्यंबक देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त भूषण अडसरे आदींचे योगदान लाभले आहे. दरम्यान महाराष्ट्राचे धर्मादाय आयुक्त प्रमोदराव तरारे, धर्मादाय सहआयुक्त जयसिंगराव झपाटे यांच्या साहाय्याने देवस्थानला सुसज्ज रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध होणार आहे.

देशभरातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून त्र्यंबकेश्वर देवस्थान ओळखले जाते. भगवान त्र्यंबकराजाची कृपा कोरोनाग्रस्त रुग्णांवर व्हावी यासाठी  महाराष्ट्राचे धर्मादाय आयुक्त प्रमोदराव तरारे यांनी ट्रस्टशी अखंड संपर्क साधून विविध उपयुक्त सूचना केल्या. यासह धर्मादाय सहआयुक्त जयसिंगराव झपाटे यांनीही ट्रस्टला मार्गदर्शन केले. ह्या त्यानुसार त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने कोरोनाग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. १ कोटी रुपये खर्चाचा हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारा प्रकल्प लवकरच त्र्यंबकनगरीत साकारला जाणार आहे. येत्या काही दिवसांत ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. देवस्थानच्या शिवप्रसाद ह्या सुसज्ज कोविड सेंटरमध्ये हा प्रकल्प लोकसेवेत दाखल होणार आहे अशी माहिती देवस्थानचे विश्वस्त भूषण अडसरे यांनी दिली. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचा कारभार पाहणाऱ्या तदर्थ समितीने याला मंजुरीही दिली आहे. दरम्यान धर्मादाय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देवस्थानला सुसज्ज रुग्णवाहिकेचे साहाय्य करण्यात येणार आहे.
जिल्ह्यासह त्र्यंबकेश्वर तालुक्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने ऑक्सिजन निर्मित करणाऱ्या प्रकल्पाद्वारे भाविकांवर त्र्यंबकराजांची कृपादृष्टी व्हावी यासाठी विश्वस्त भूषण अडसरे यांनी नियमित पाठपुरावा केला. ह्या पार्श्वभूमीवर देवस्थानने १ कोटी खर्चाचा ऑक्सिजन प्रकल्प उभा करण्याचा दूरगामी निर्णय घेतला आहे.

बैठकीप्रसंगी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश विकास कुलकर्णी, सचिव तथा मुख्याधिकारी संजय जाधव, विश्वस्त भूषण अडसरे, डॉ. सत्यप्रिय शुक्ल, प्रशांत गायधनी, तृप्ती धारणे, संतोष कदम, ऍड. पंकज भुतडा आदी उपस्थित होते. बैठकीत सांगण्यात आले की, कोरोनाच्या काळात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शिवप्रसाद कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. मात्र,आगामी काळात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याने धोका वाढला आहे. ट्रस्टने नेहमीच भाविक व नागरिकांसाठी लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत. अनेकांच्या घरातील कर्ते पुरुष बळी गेल्यामुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते आहे. अशा कुटुंबांचा प्राण असणाऱ्या सर्व रुग्णांच्या गुदमरणाऱ्या श्वासांना वाचवण्यासाठी ट्रस्टचा ऑक्सिजन प्रकल्प नवसंजीवनी देणारा ठरेल. भगवान त्र्यंबकराज यांचा जणू हा प्रकल्प म्हणजे प्रसाद असल्याचे मानले जात आहे.

 महाराष्ट्राचे धर्मादाय आयुक्त प्रमोदराव तरारे, धर्मादाय सहआयुक्त जयसिंगराव झपाटे यांच्या मार्गदर्शनाने त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने ऑक्सिजन प्लांट निर्मित करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. माझ्या प्रयत्नांना आलेले यश मी त्र्यंबकराज चरणी समर्पित करतो. ट्रस्टच्या माध्यमातून माणसांच्या हृदयातील परमेश्वराची सेवा यानिमित्ताने घडेल. धर्मादाय अधिकारी आणि ट्रस्टचे पदाधिकारी यांचेही मी भाविकांतर्फे ऋण व्यक्त करतो.
- भूषण अडसरे, विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान
त्र्यंबकेश्वर देवस्थानचे शिवप्रसाद कोविड सेंटर आता ऑक्सिजन प्रकल्प आणि सुसज्ज रुग्णवाहिकेमुळे सर्वार्थाने अद्ययावत होणार आहे. देणगीदार आणि भक्तांच्या सहकार्यातून आम्ही हे करू शकत आहोत. यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे आम्ही आभारी व्यक्त करतो. लोकांनी सरकारच्या सूचनांचे पालन करून आपली काळजी घ्यावी.
- न्या. विकास कुलकर्णी, अध्यक्ष देवस्थान ट्रस्ट