नागोसली, वैतरणा व शिदवाडी येथील रखडलेल्या पुनर्वसन गावठाणाबाबत नूतन खासदार राजाभाऊ वाजे यांनी घातले लक्ष : जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना कार्यवाहीसाठी बैठकीत दिले निर्देश

इगतपुरीनामा न्यूज – नागोसली, वैतरणा व शिदवाडी येथील पुनर्वसन गावठाणाबाबत शक्य तेवढ्या लवकर योग्य तो निर्णय घेऊन ग्रामस्थांचा प्रश्न सोडवावा अशा सूचना नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी आज जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना केल्या. नागोसलीचे सरपंच काशिनाथ होले, उपसरपंच अशोक शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश धापटे, चंदर गिऱ्हे, सुमन मुतडक यांनी ह्याप्रकरणी खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. खासदार वाजे यांनी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा ह्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती. खासदारांच्या प्रयत्नांनी नागोसली, शिदवाडी व वैतरणा ह्या गावांच्या गावठाणाचा प्रश्न लवकरच सुटेल असा विश्वास उपसरपंच अशोक शिंदे यांनी व्यक्त केला. पुनर्वसन उपजिल्हाधिकारी सौ. भारदे यांच्याशी देखील सर्वांनी चर्चा केली. सर्वांगीण माहिती घेऊन शासकीय नियमाप्रमाणे गावठाण उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासकीय स्तरावरून लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले.

नागोसली, शिदवाडी व वैतरणा ता. इगतपुरी येथील शेत जमिनी १९६९-७० मध्ये वैतरणा धरणासाठी संपादित असून ह्या गावाचे पुनर्वसन पाटबंधारे विभागाने संपादित केलेल्या जागेत करण्यात आले. परंतु पुनर्वसन झाल्यापासून आजपर्यंत गावाला अधिकृत शासकीय गावठाण उपलब्ध नाही. त्यामुळे गावाला किती गावठाण उपलब्ध करून दिले आहे याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. विविध विकास कामे करताना गावठाणात किती जागा आहे किंवा नाही याचा बोध होत नसल्यामुळे गावाला खूप अडचणीचा सामना करावा लागतो. यामुळे घरकुलासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा देता येत नाही. पाटबंधारे विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष होते. शासनाच्या गावठाणातील जमिनीचे गीष्टी आधारित सर्वेक्षण व भूमापन करणे योजनेंतर्गत नागोसलीच्या गावठाणाची ड्रोनद्वारे मोजणी झाली आहे. मात्र शिदवाडी व वैतरणा वसाहतीची मोजणी करण्यात आली नाही. भूमी अभिलेखकडून ड्रोनद्वारे मोजणीसाठी कर्मचारी आले असता पाटबंधारे विभागाने ही जागा पाटबंधारे विभागाची असल्यामुळे गावठाणाची मोजणी करता येणार नाही अशी भूमिका घेतली होती. यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून नागोसली, शिदवाडी व वैतरणा या गावांना रीतसर गावठाण उपलब्ध करून द्यावे अशी भूमिका उपसरपंच अशोक शिंदे यांनी यावेळी मांडली.

Similar Posts

error: Content is protected !!