
इगतपुरीनामा न्यूज – अपघात झाला नाही असा एकही दिवस सध्या मुंबई आग्रा महामार्गावर जात नाहीये. वाहनांचे आपल्या वेगावर नियंत्रण नसून बेफाम वाहने वाढली आहेत. येथून प्रवास करणारा व्यक्ती सुखरूप राहावा अशी प्रार्थना त्याचे कुटुंबीय करीत असतात. आज सकाळी दहाच्या सुमारा एक चारचाकी वाहन मुंढेगावजवळ असलेल्या शासकीय आश्रमशाळेच्या समोर अचानक बंद पडले. यामध्ये एकाच कुटुंबातील ४ जण मुंबईकडून नाशिकच्या दिशेने प्रवास करीत होते. मागे कोणतेही वाहन नसल्याने बंद पडलेल्या चारचाकी वाहनातील सर्वजण खाली उतरून बाजूला सुरक्षित जाऊन बसले. वाहनचालकाने वाहन बंद पडले असल्याचे समजावे म्हणून इंडिकेटर सुद्धा सुरु केला. काही वेळाने पाठीमागून भरधाव वेगात त्यांना ट्रक येतांना दिसला. ट्रकचालकाला त्यांनी हाताने इशारे करून वेगावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करायला सांगितला. मात्र वेगात असणाऱ्या ट्रकचालकाने दखल न घेता बंद असलेली कार मागून ठोकली. काही वेळापूर्वी ४ जण बाजूला गेले नसते तर मोठी जीवितहानी झाली असती. या घटनेतून सर्वजण सुखरूप बचावले असले तरी जीवघेण्या वेगात वाहने चालवणाऱ्या बेधुंद वाहनांवर प्रशासनाने अंकुश ठेवायला पाहिजे अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.