कवी –प्रमोद शंकर चिंचोले
सुसंवाद – ९८८१७२१०३०
अक्षय सुखाची
अक्षय प्रेमाची
वैशाख तृतीया
मांगल्याची ।।
अक्षय धनाची
अक्षय दानाची
जपावी संपत्ती
आरोग्याची ।।
माहेरवाशीण
प्रेमळ बहिण
भावाच्या भेटीला
आसुसली ।।
उंच उंच झोका
आठवांचा झुला
सख्यांच्या भेटीला
आतुरला ।।
करा अन्नदान
करा जलदान
दयावे वस्त्रदान
आनंदाने ।।
शुभदिन योग
शुभ मुहुर्तही
दानधर्म होई
फलदायी ।।
सण चैत्रगौरी
ठेवा मांगल्याचा
सुख साफल्याचा
बहरावा ।।
पुरणाची पोळी
गोड आमरस
जेवण सुरस
आखाजीचे ।।
भरावी बोळकी
मातीच्या माठाची
क्षुधा भागवावी
गरिबाची ।।
घागर मडके
ब्राम्हणाला दान
मंत्रांचे पठण
मांगल्याचे ।।
गावू चला गाणी
अक्षय शेतीची
भिजल्या मातीची
बळीराजा ।।
आखाजीचा सण
बहिणीचा ठेवा
प्रेम तुझे भावा
लाभो सदा ।।
धनलक्ष्मी घरा
वैभव अपार
रोप लावू चार
साफल्याचे ।।
कवी प्रमोद चिंचोले हे उत्कृष्ट कविता लिहिण्यासाठी प्रसिद्ध आहेत. नाशिकच्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामध्ये शिक्षण विस्ताराधिकारी ह्या पदावर ते कार्यरत आहेत.