
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघातील वायघोळ मतदार केंद्रात सायंकाळी ६ नंतरही किमान २५० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगेत उभे आहेत. मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर ही गर्दी असून आतापर्यंत ह्या केंद्रात ८०२ मतदान पार पडलेले आहे. १ हजार ३०० मतदार संख्या असलेल्या ह्या मतदान केंद्रात रात्री ९ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहील असा अंदाज व्यक्त केला जातोय. शिंदे गट युवासेनेचे नेते मिथुन राऊत यांनी सांगितले की, वायघोळ मतदान केंद्रात मी माझा मतदानाचा हक्क बजावला. गावातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे लोकशाहीचा उत्सव साजरा केला. वेळेच्या आधीच आलेल्या सर्व मतदारांना मतदान करू दिले जाणार आहे. सर्वांना हक्क बजावता यावा म्हणून प्रशासनाने नियोजन केले असून रात्री पर्यंत येथील मतदान पार पाडले जाण्याचा अंदाज आहे. दरम्यान इगतपुरी तालुक्यातील खंबाळेवाडी येथील मतदान केंद्रातही अद्याप १०० ते १५० मतदार रांगेत उभे आहेत. याही केंद्रात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उशीर लागणार असल्याचे समजते.
