लोकसभा निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दल सज्ज : नागरिकांनी सुटी नव्हे ड्युटी समजुन मोठ्या संख्येने मतदान करावे – एसपी विक्रम देशमाने 

इगतपुरीनामा न्यूज –  निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुक प्रक्रिया देशभरात सुरू आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्रात शेवटच्या पाचव्या टप्प्यातील निवडणुक प्रक्रिया नाशिक जिल्ह्यात पार पडत जात आहे. जिल्ह्यात नाशिक, दिंडोरी व धुळे या तीन लोकसभा मतदारसंघा मतदान प्रक्रिया सोमवारी २० तारखेला पाचव्या टप्प्यात पार पडणार आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रात १२ विधानसभा मतदारसंघाचा समावेश असुन त्यानुसार मतदान होणार आहे. त्यानुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाकडून १ पोलीस अधीक्षक व २ अपर पोलीस अधीक्षक, १३ पोलीस उपअधीक्षक व ३५५ पोलीस अधिकारी, ५८०० पोलीस अंमलदार, ३३०० होमगार्डस्, एसएपीएस. दलाच्या १० कंपनी, एसआरपीएफ च्या २ कंपनी असे नियोजन करून बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात १३ आंतरराज्य व ९ आंतरजिल्हा चेक पोस्ट लावण्यात आलेले आहे. पेट्रोलिंगसाठी प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय ५ पथके कार्यरत असणार आहेत. अवैध कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी ४० भरारी पथके तैनात आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ग्रामीण पोलीसांनी अवैधरित्या मद्याची वाहतुक व विक्री करणाऱ्या इसमांवर दारूबंदी कायद्यान्वये १२९२ गुन्हे दाखल करून ९१ हजार ३०६ लिटरचा अवैध मद्यसाठा असा १ कोटी २८ लाख १८ हजार ८७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सीमावर्ती भागातुन, राज्य व राष्ट्रीय महामार्गावर, स्थानिक स्तरावर अवैधरित्या मद्याची वाहतुक, अवैध शस्त्रे, अवैधरित्या रोख रक्कमेची वाहतुक करणाऱ्यांवर सत्वर कारवाई करण्यात येणार आहे. हॉटेल, ढाबे व इतर ठिकाणांवर अवैधरित्या मद्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. जिल्हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, हिस्ट्रीशीटर, गावगुंड यांच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर ठेवण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे आवश्यक ती खबरदारी व दक्षता घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी सुटी नव्हे ड्युटी समजुन मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!