इगतपुरी तालुक्यात लोकसभेसाठी शांतता आणि उत्साहात मतदान सुरु : मोडाळे येथे मतदान करणाऱ्या कुटुंबांना फळझाडांचे वाटप

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकीसाठी उत्साहात आणि शांततेत मतदान सुरु झाले आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत ४४ हजार ८८९ मतदारांनी आपला हक्क बजावला. १६.३८ टक्के मतदान झाले असून टक्केवारी वाढणार असल्याचा अंदाज आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे, महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, अपक्ष शांतिगिरी महाराज, वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत असली तरी दुरंगी सामना पाहायला मिळणार आहे. प्रत्येक पक्षाच्या समर्थकाने अधिकाधिक मतदान पारड्यात मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आज सायंकाळी सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होईल. जास्तीतजास्त मतदान व्हावे यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. पोलीस यंत्रणेकडून सूक्ष्म नियोजन आणि बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतदान अधिकारी आणि कर्मचारी लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी सक्रियतेने काम करीत आहेत. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्वांनी कसून प्रयत्न सुरू केले आहेत. इगतपुरी, घोटी, वाडीवऱ्हे, हरसूल, त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून मतदान शांततेत पार पाडण्यासाठी योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारे गैरप्रकार आणि आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचे आढळून आल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी अधिकाधिक संख्येने मतदारांनी सहभागी व्हावे. इगतपुरी विधानसभा संघातील मतदार निवडणूक यंत्रणेला नेहमीच सहकार्य करतात. निष्पक्ष वातावरणात निवडणूका पार पडत असतांना प्रशासनही सूक्ष्म लक्ष ठेवून आहे अशी माहिती इगतपुरीच्या निवडणुक नायब तहसीलदार वर्षा वाघ यांनी सांगितले. मतदारांनी मतदान करावे यासाठी इगतपुरी तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत मोडाळे यांच्याकडून माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत जनजागृती करण्यात आली. मतदान करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला १ फळझाड देऊन ते जोपासण्याचा संदेश दिला जात आहे. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याची आठवण म्हणून हे फळझाड गावाला फायदेशीर ठरेल असे मतदारांनी सांगितले. 

Similar Posts

error: Content is protected !!