
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ग्रामपंचायतीला माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचे १ कोटी आणि अन्य कामगिरीसाठी ५० लाख असे १ कोटी ५० लाखांचे पारितोषिक घोषित करण्यात आले आहे. राज्य शासनाने आज मोडाळे ग्रामपंचायतीसह बक्षीसपात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नावाची घोषणा केली. १५०० ते २५०० लोकसंख्या गटात मोडाळे गावाची उच्चत्तम कामगिरी बक्षीसपात्र ठरली. लवकरच राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, ना. देवेंद्र फडणवीस आणि अन्य मंत्री यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. मोडाळेचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांना यावेळी सन्मानित केले जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी आनंद व्यक्त करून मोडाळे ग्रामपंचायतीला शुभेच्छा दिल्या आहेत. गटविकास अधिकारी प्रशांत पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय पवार यांनीही आनंद व्यक्त केला आहे. पृथ्वी, वायु, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित “माझी वसुंधरा अभियान” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यास सुरवात झाली. “माझी वसुंधरा अभियान ४.०” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यातील ४१४ नागरी स्थानिक संस्था व २२ हजार २१८ ग्रामपंचायती अशा एकूण २२ हजार ६३२ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता.