
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट या पक्षात नाशिक लोकसभेच्या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेचा तिढा वाढला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी उमेदवारी करणार नसल्याची घोषणा करून राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याचे सांगितले होते. यातच पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना मी नाशिकमधून उभे करेल असे म्हटले होते. ४०० खासदार निवडून आणण्याचे लक्ष्य असलेल्या दिग्गज महायुतीकडून नाशिकच्या जागेबाबत दोन तीन महिने आधीच उमेदवार निश्चित झाल्याचे पदाधिकारी खासगीत सांगतात. भाजपकडून इच्छुक असेलेले दिनकर अण्णा पाटील, स्वामी श्री कंठानंद आदी इच्छुक उमेदवार सध्या उमेदवारीबद्धल मौन धरून आहेत. अर्थात भाजपाकडून नाशिकच्या जागेवर हमखास निवडून येणाऱ्या देशपातळीवरील नावाचा गोप्यस्फोट होण्याची शक्यता अधिकाधिक बळावली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काही महिन्यापूर्वीचा नाशिक दौरा, जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या सोबत व्यक्तिगत फोटोसेशन, युवकांशी संवाद, काळाराम मंदिरातील स्वच्छता मोहीम, दर्शन, आरती, रॅली यासह इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील कातकरी विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद आदी बाबी पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच नाशिकच्या जागेवर उमेदवारी करणार असल्याची चर्चा आणि अफवा सगळीकडे पसरली आहे. यापूर्वी राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनीही नाशिकमधूनच राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला होता.
भाजपच्या इच्छुक उमेदवारांकडून मागील एक वर्षांपासून मतदार संघात संपर्क मोहीम राबवली गेली. शिवसेना शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवारानेही तयारी केली होती आणि आहे. प्रबळ दावेदार नेतेही सध्याच्या परिस्थितीत शांत आहेत. ४०० खासदार निवडून आणणार असा दावा करणाऱ्या महायु्तीकडून नाशिकच्या उमेदवारीची घोषणा अद्याप होत नसल्याने राज्यात आश्चर्य व्यक्त होते आहे. भाजपाच्या यंत्रणेकडून बूथनिहाय सूक्ष्म नियोजन आणि माहिती घेऊन यापूर्वी चाचपणी सुद्धा करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या भावना सुद्धा विचारात घेतल्या गेल्या आहेत. नाशिकचे आणि प्रभू श्रीरामाचे दृढ असे नाते आहे. यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याला त्यावेळी चांगलेच महत्व आले होते. नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपचे ३ आमदार, मित्र पक्षांचे २ आमदार आदी गोष्टींचे गणित जुळवल्यास भाजपाकडून नाशिकच्या जागेसाठी दिग्गज नाव घोषित करून धक्कातंत्र राबवले जाईल असा अंदाज आहे. एकंदरीत सर्वांगीण बाजूचा सूक्ष्म विचार करता देशाचे दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीकडून उमेदवारी करण्याची शक्यता नाकारता येणार नाही अशी अफवा पसरली आहे. या विषयावर विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी मुक्त संवाद साधला असता त्यांच्याकडून नाशिकच्या जागेसाठी प्रबळ नाव पुढे येऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली.