विद्यार्थ्यांनी कायद्यांबाबत साक्षर होणे आवश्यक – ॲड. विजयमाला वाजे

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कायदेविषयक ज्ञान असणे आवश्यक असून या ज्ञानाचा फायदा आपल्याबरोबरच समाजाला होणे देखील गरजेचे आहे. आज सर्वच क्षेत्रात साक्षरतेसाठी प्रयत्न होत आहेत तसेच प्रयत्न कायद्याच्या साक्षरतेसाठी होणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन इगतपुरी न्यायालयातील नोटरी ॲड. विजयमाला वाजे यांनी केले. इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कायदेशीर साक्षरता क्लबच्या उदघाटनप्रसंगी ॲड. वाजे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड हे होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, प्रा. एस. एम. चव्हाण, पर्यवेक्षक प्रा. एस. बी. फाकटकर, प्रा. आर. एस. गायकवाड, प्रा. अरूण वाघ उपस्थित होते.

ॲड. विजयमाला वाजे आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या की, कायदेशीर साक्षरता क्लबच्या माध्यमातून विविध कायद्यांवर प्रबोधन आणि जनजागृतीची गरज आहे. याप्रसंगी त्यांनी विविध कायद्यांची माहिती आपल्या भाषणात दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांनी आपले हक्क, कर्तव्ये व जबाबदाऱ्या काय आहेत हे समजून घेऊन कायदेविषयक साक्षरता क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ज्ञान संपादन केले पाहिजे असे सांगितले. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आर. एस. गायकवाड यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी करून दिला. आभार प्रा. एस. एम. चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. सौंदाणे, प्रा. पाटील, प्रा. भालेराव, प्रा. मालसाने व विद्यार्थी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!