मोबाईल चोरणारा घोटीचा युवक रेल्वे पोलिसांकडून अटक : २ लाख ४० हजाराचे ८ मोबाईल जप्त

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई ते नाशिक रोड असा रेल्वे प्रवास करतांना अज्ञात चोरट्याने घोटी रेल्वे स्टेशन येथे गर्दीचा फायदा घेवुन मोबाईल चोरल्याची फिर्याद मयूर मनीलाल भंगर रा. डोंबिवली यांनी २० मार्चला इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी मोबाईल ट्रेसिंगनंतर राजु चव्हाण याच्याकडुन ह्या गुन्ह्यातील मोबाईल जप्त केला. तपासाअंती त्याने सागर मोहन माळी वय २०, रा. घोटी याच्याकडून मोबाईल घेतल्याचे सांगितले. रविवारी २८ एप्रिलला गुप्त बातमीनुसार इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन बनकर, सहाय्यक फौजदार हेमंत घरटे, पोलीस नाईक बापू गोहिल, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद आहाके, अरविंद तावाडे, निरज शेंडे, अमोल निचत, नितीन देशमुख, अरुणा सानप, सुजाता निचड यांच्या पथकाने रेल्वे स्टेशन घोटी परिसरात सागर माळी याला ताब्यात घेतले. अधिक तपासात त्याने मोबाईल चोरी करुन राजु चव्हाण याला विक्री केल्याचे कबुल केले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशातुन एक आयक्यु कंपनीचा मोबाईल मिळुन आला. त्याने सदरचा मोबाईल घोटी रेल्वे स्टेशन येथे गाडी थांबल्यानंतर गाडीमध्ये जावुन चोरी केल्याचे सांगितले. भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३७९ अन्वये मोबाईल चोरीचे २ गुन्हे दाखल आहेत. त्या दोन्ही गुन्ह्यात संशयित आरोपी सागर मोहन माळी याचे नाव निष्पन्न झाल्याने रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून २ लाख ४० हजार किमतीचे ८ मोबाईल जप्त करण्यात आले असून पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे.

Similar Posts

error: Content is protected !!