भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात नेहमीच इंदिरा काँग्रेसचे प्राबल्य सिद्ध झालेले आहे. सलग ३ पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीत विरोधक एकत्र येऊनही इंदिरा काँग्रेसला विजयापासून रोखू शकलेले नाही. भौगोलिक रचनेत त्र्यंबकेश्वर हा संपूर्ण तालुकाही ह्या मतदार संघात निर्णायक मतांची आघाडी देत असतो. जातीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर असल्याने मतांचे होणारे विभाजन विजयी उमेदवाराच्या पथ्यावर पडते. इंदिरा काँग्रेस, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मनसे, शेकाप, माकप, वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्ष याप्रमाणे इगतपुरी तालुक्यातील पक्षांची स्थिती दिसून आलेली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकांत शिवसेना पक्ष प्रबळ ठरत असतो. मागील काही वर्षाचा राजकीय पक्षांचा इतिहास, सध्याच्या लोकसभा निवडणुकपूर्व काळात राजकीय पक्षांत पडलेली फूट आणि निर्माण झालेली आकस्मिक परिस्थिती यंदाच्या निवडणुकीत नव्याने समिकरणे बदलू शकते. राज्यातील आरक्षण आंदोलने आणि बदललेली जातीय समीकरणे सुद्धा अतिशय प्रभावी ठरु शकतात. उबाठा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि इंदिरा काँग्रेस यांची एकत्रित मोट राजाभाऊ वाजे यांच्या यशाची नांदी ठरु शकते. भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडील उमेदवाराचा घोळ अद्याप सुटलेला नाही. मात्र सगळ्या पक्षांमध्ये असलेल्या अंतर्गत कुरबुरी, जातींची बदललेली समीकरणे, उमेदवाराची निवड, बंडखोर उमेदवारांचे आव्हान पाहता ही निवडणूक आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम व अभूतपूर्व गुंतागुंत निर्माण करणारी ठरू शकते.
इतर पक्षांच्या तुलनेत इगतपुरी विधानसभा मतदार संघात सध्याच्या स्थितीत निश्चितपणे इंदिरा काँग्रेसने कार्यकर्त्यांचे संघटनात्मक जाळे भक्कम आहे. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटानेही संपर्कावर भर दिलेला आहे. सोबत निर्णायक असणारी उबाठा शिवसेना ताकद वाढवत आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनीही लोकसभा निवडणुकीत विजयासाठी कसून नियोजन केल्याचे दिसते. माकप, शेकाप, वंचित बहुजन आघाडी, मुस्लिम आणि दलित बांधवांची मतपेटीही प्रभावी असणार आहे. इगतपुरी तालुक्यातील शेतकरी, समृद्धी आणि अन्य प्रकल्पग्रस्तांचे रखडलेले प्रश्न, स्थानिक कामगार युवकांच्या रोजगाराची ओरड, वैतरणा धरणासाठी संपादित अतिरिक्त जमिनीचे दुखणे, विद्यमान पदाधिकाऱ्यांनी न पाळलेली आश्वासने, प्रलंबित पाणी योजना आणि पाणीटंचाईच्या समस्या, आदिवासी बांधवांचे प्रश्न आदी फॅक्टर मतांवर दुरगामी परिणाम केल्याशिवाय राहणार नाहीत. हे सगळं असलं तरी राजाभाऊ वाजे यांची उबाठा शिवसेनेने घोषित केलेली उमेदवारी सोडता अजूनही अन्य पक्षांच्या उमेदवाराची निश्चिती झालेली नाही. उमेदवार कोण असेल याचे उत्तर मिळाल्यानंतर लढतीचे खरे चित्र समोर येणार असून सगळ्या पक्षांना बंडखोरीप्रमाणे नाराजी नाट्याचा सुद्धा सामना करावा लागू शकतो. नाशिकचा आगामी खासदार कोण हे निश्चित करण्याची भक्कम क्षमता मात्र इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाकडे हे मात्र नक्की..!