वाल्मिक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २८
इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथील अहिलू देवराम शिद ( वय १९ ) या आदिवासी घरातील कर्त्या युवकावर चार महिन्यांपूर्वी वीज कोसळून तो ठार झाला होता. त्याच्या कुटुंबियांना आमदार हिरामण खोसकर यांच्या पाठपुराव्याने तहसीलदार कार्यालयामार्फत वारसांना चार लाख रुपयांचा धनादेश आज तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या हस्ते देण्यात आला.
अहिलू हा घरातील करता युवक असल्याने गावात हळहळ व्यक्त होत होती. सरपंच मारुती आघाण, उपसरपंच गणेश गायकर, माजी सरपंच विठ्ठल आघाण, सदस्य बुधा गांगड यांनी आमदार हिरामण खोसकर यांच्याकडे संबंधित कुटूंबियांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार आज आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या हस्ते चार लाख रुपयांचा धनादेश वारसांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस भास्कर गुंजाळ, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, अरुण गायकर, पंकज माळी, ज्ञानेश्वर कडू, प्रकाश तोकडे, दीपक गायकवाड आदी उपस्थित होते.