इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्याच्या अतिमागास आदिवासी भागातील आदिवासी आणि गरिबांच्या जीवनात परिणामकारक परिवर्तन करण्याचा ध्यास घेतलेले कुटुंब म्हणजे गोकुळ धोंगडे यांचे कुटुंब. कुऱ्हेगाव येथील ह्या कुटुंबाच्या ध्यासाला खऱ्या अर्थाने बळकट करण्यासाठी सिंहाचा वाटा असणाऱ्या अश्विनी गोकुळ धोंगडे ह्या गरिबांच्या जीवनात आनंदाचे “गोकुळ” फुलवण्यासाठी पदर खोचून कायमच तयार असतात. पतीच्या खांद्याला खांदा लावून समाजाची सेवा करण्याचे व्रत घेतलेल्या अश्विनीताई चांगले काम करूनही प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंद करतात. पती गोकुळ धोंगडे यांच्या प्रत्येक सामाजिक कार्याचे कौतुक करून प्रोत्साहन दिल्यामुळे कमी काळातच गोकुळ धोंगडे तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकले आहेत. पाडळी देशमुख येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील माहेर असलेल्या अश्विनीताई समाजाचे काम करतांना न थकता, न दमता आणि न कंटाळता अविरतपणे काम करते आहे.
आई संगीता आणि वडील भास्कर यांच्याकडून मिळालेले माहेरचे संस्कार, संस्कृतीसह छत्रपती शिवरायांचे विचार अंगात भिनलेली अश्विनीताई यशस्वी उद्योजिका सुद्धा आहेत. अश्विनीताई आणि गोकुळभाऊ धोंगडे यांनी वाघाच्या तोंडात हात घालावा इतक्या सहजतेने परिस्थितीच्या छाताडावर पाय रोवून घोटीसारख्या ठिकाणी २ हॉटेल उभे केलेत. हॉटेल शिवभोले ह्या माध्यमातून शहीद जवान कुटुंबीय आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मोफत अल्पोपहार दिला जातो. दोघे पतिपत्नी नेहमीच समाजाचे हित जोपासणारे सामाजिक उपक्रम राबवत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शहीद दिनानिमित्त विरनारी वीरमाता बहूउद्देशीय सेवाभावी संस्था व प्रहार सैनिक कल्याण संघाने त्यांना “इगतपुरीरत्न” दिला आहे. नामवंत मान्यवरांच्या हस्ते त्यांना नाशिक येथील कार्यक्रमात हा पुरस्कार वितरित करण्यात आला. इगतपुरी तालुक्यातील विविध मान्यवर आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.