केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते गडवाट संस्थेचा सन्मान

इगतपुरीनामा न्यूज – आजवर महाराष्ट्रात गडकिल्ल्यांवर काम करणाऱ्या किंवा गडभ्रमंती आयोजित करणाऱ्या अनेक संस्था संघटना तयार झाल्या आहेत. त्यात सोशल मिडिया आल्यानंतर लोकांत जागरूकता वाढली. पण हल्ली 5-6 वर्षांपासून भर पडली ती व्यावसायिक गडभ्रमंती आयोजित करणाऱ्या कंपन्यांची आणि पेव फुटले ते अगदी स्पर्धेचे. या संस्था संघटनेतील स्पर्धांना फाटा देऊन एक वेगळाच पायंडा पाडणारी संस्था म्हणजे गडवाट प्रवास सह्याद्रीचा. २०११ साली पुण्या-मुंबईत राहणाऱ्या काही मुलांनी छत्रपती शिवराय आणि गडकिल्ले यांच्या प्रेमापोटी एकत्र येऊन गडवाट या संस्थेची स्थापना केली. गडावर नेणारी वाट म्हणजेच गडवाट. नव्या तरुण पिढीला तसेच गडकिल्ल्यांवर कुठलीही आस्था नसताना फक्त मौजमजा म्हणून फिरायला जाणाऱ्या मुलांमध्ये हा अफाट सह्याद्री तसेच गडकिल्ल्यांचे महत्त्व समजून सांगण्यासाठी, गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी, जनमानसात गडकिल्ल्यांची व महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची माहिती पोहोचावी, गडभ्रमंती सोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य हातून घडावे हाच काय तो गडवाट संस्थेचा व सर्व गडवाटकरी सदस्यांचा मूळ उद्देश. गडवाट-प्रवास सह्याद्रीचा ही सामजिक संस्था संपुर्ण राज्यात सक्रिय असून दुर्गमहर्षी प्रमोद मांडे (भाऊ) यांच्या प्रेरणेतून संस्थेने यापूर्वी शिवजयंतीनिमित्त रुग्णवाहिका, डिजिटल शाळा, लोखंडी पूल, युद्धस्तंभ स्थळ उभारणी, पिण्याच्या पाण्यासाठी कुपनलिका, मुलांना पुस्तकांचे वितरण, किल्ला संवर्धन, तुळापूर संवर्धनासाठी मदत आदीविविध समाजपयोगी उपक्रम राज्यभरात राबविले आहेत. तसेच वर्षभर ज्या ज्या ठिकाणी सामाजिक आर्थिक दुर्बल घटकांना मदतीची आवश्यकता असते त्या त्या वेळी गडवाट कडून मदतीचा हात पुढे करण्यात येत असतो. आत्तापर्यंतच्या कार्याच्या ठळक बाबी म्हणजे पूरग्रस्तांना मदत, आग लागलेल्या भागात गरीबांना पुनर्वसनासाठी मदत, वैद्यकीय मदत आदी प्रकारच्या कार्याचा सहभाग आहे.

गडवाट संस्थेचे अध्यक्ष सुहास पवार, माजी अध्यक्ष ईश्वर सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली २०२४ या वर्षाची शिवजयंती राज्यभरातून पाच शाळांची शैक्षणिक सहल हा उपक्रम राबवून दुर्गसंस्कार करून करण्याचे ठरवण्यात आले होते, त्यावर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची सहल गडकिल्ल्यांवर काढण्यात आली. ३०० हून विद्यार्थ्यांना गडकिल्ल्यांची सफर आणि दुर्गसंस्कार करण्यात आले त्यावेळी किल्ल्याची बांधणी, किल्ल्याचा संपुर्ण इतिहास, विविध भागांची नावे, खंदक, कोट इत्यादी दुर्गसंस्कार करण्यात आले. या विद्यार्थ्यांचा संपुर्ण खर्च संस्थेने उचलला आहे. “समाजसेवा हीच शिवरायांना खरी मानवंदना” ह्या मुल तत्त्वावर संस्था आज पाय रोवून आहे. आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन सरदार पिलाजी जाधव यांचे थेट वंशज अमरदादा जाधवराव यांचेकडून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नांदेड सिटीचे डेव्हलपर जाधवराव इम्परिओचे संचालक तसेच श्री अमरसिंह जाधवराव यांच्या पुणे कॅम्प येथील निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी हा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अमरसिंह दादा जाधवराव यांच्याशी संलग्नित असलेल्या संस्था गडवाट-प्रवास सह्याद्रीचा, मराठी देशा फाउंडेशन, गडकिल्ले संवर्धन समिती- पिंपरी चिंचवड, शंभुराज्यभिषेक सोहळा समिती- महाराष्ट्र राज्य, डोंगरयात्रा ट्रस्ट, श्रीमंत छत्रपती थोरले शाहूमहाराज समाधी जीर्णोद्धारकर्ते श्री अजय वीरसेन जाधवराव, श्री दामोदर मगदूम, अनिल दुधाणे, डॉ. संग्राम इंदोरे आदी मान्यवरांचाही सन्मान ना. गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. याबाबतची माहिती गडवाट संस्थेचे सदस्य सीएमए भुषण पागेरे यांनी दिली.

Similar Posts

error: Content is protected !!