इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
पत्नी नांदायला येत नाही या कारणाची कुरापत काढुन जावयाने सासुच्या पोटात कात्री खुपसुन ठार केले तर भांडण सोडवणाऱ्या पत्नी आणि मुलीलाही विळ्याचे वार करून गंभीर जखमी केल्याची घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड बुद्रुक येथे घडली आहे. झारवड येथील जोशी कंपनी जवळ राहणाऱ्या सासुच्या पोटात जावयाने धारदार कात्री खुपसुन ठार मारल्याची घटना घडली आहे. सासु व जावयाचे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पत्नी व मुलीवर धारदार विळ्याने जिवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत सासु जागीच ठार झाली आहे तर पत्नी व मुलगी गंभीर झाली असुन पत्नी व मुलीला उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती समजताच पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपविभागीय अधिकारी कविता फडतरे, घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन संशयित आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे.
याबाबत घोटी पोलीस ठाण्यात बाळा निवृत्ती भुतांबरे, रा. जांभुळवाडी, ता. त्र्यंबकेश्वर याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जांभुळवाडी येथील कळमुस्ते येथील किसन महादु पारधी याचे लग्न झारवड येथील कमळाबाई सोमा भुंताबरे यांच्या मुलीशी झालेले होते. त्याची पत्नी इंदुबाई किसन पारधी ही सासरी नांदावयास जात नव्हती. रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास किसन पारधी याने पत्नी इंदुबाई पारधी सासरी नांदावयास का येत नाही अशी कुरापत काढुन पत्नी इंदुबाई पारधी हीला विळ्याने गळ्यावर मारहाण करू लागला म्हणुन सासु कमळाबाई सोमा भुताबरे, वय ५५ वर्ष व आरोपीची मुलगी माधुरी किसन पारधी, वय १२ वर्ष, या भांडण सोडवण्यासाठी मधे गेल्या असता किसन पारधी याने माधुरी पारधी हिच्या हातावर विळ्याने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने माधुरी गंभीर जखमी झाली. तसेच सासु कमळाबाई भुतांबरे यांच्या पोटात व पाठीत कात्री खुपसुन जागेवरच ठार केले. तसेच पत्नी इंदुबाई पारधी हिच्या गळ्यावर विळ्याने गंभीर वार केल्याने तिचीही प्रकृती चिंताजनक असल्याची फिर्याद घोटी पोलीसात दाखल केली. पोलीस ठाण्यात किसन पारधीच्या विरोधात भादवि कलम ३०२, ३०७, ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना घडलेल्या ठिकाणी पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपविभागीय अधिकारी कविता फडतरे, सहायक पोलीस दिलीप खेडकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. यावेळी पोलीसांनी आरोपी किसन पारधी याला अटक केली असुन किसन पारधी हाही जखमी असल्याने त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, महिला सहायक पोलीस निरीक्षक श्रध्दा गंधास, पोलीस हवालदार शितल गायकवाड, रविराज जगताप, शिवाजी शिंदे, गोविंद सदगीर, अमोल केदारे, कोरडे, पंकज दराडे आदी करीत आहे.