
इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ – मुंढेगाव येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ) यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व या विषयावर जनजागृती करण्यात आली. विद्यार्थिनींना यावेळी महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विभागाने हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्या निमित्ताने इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींना या कार्यक्रमात जनजागृती करण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थिनींना पौष्टिक तृणधान्याचे आहारात महत्व आणि त्यांचा आरोग्याला फायदा याविषयावर आत्मा नाशिकच्या प्रकल्प उपसंचालक वंदना शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यात बाजरी, ज्वारी, नागली, वरई, राजगिरा यावर आधारित विविध पदार्थ बनवणे, त्यांच्यातील प्रथिने, जीवनसत्वे, लोह, कॅल्शियम इत्यादी आहारातील स्त्रोत याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कटारे, इगतपुरी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हितेंद्र मोरे, मुकणे येथील कृषी सहाय्यक एस. पी. कोकाटे, त्र्यंबकेश्वर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक त्महेंद्र सोनवणे, मुंढेगावचे कृषी मित्र हरी गतीर, शिक्षक वृंद आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या