समृद्धीचा ‘भरवीर‌ ते नांदगाव सदो’ टप्पा कार्यान्वित करण्यापुर्वी प्रकल्पग्रस्तांवरील अन्याय दूर करा : आमदार हिरामण खोसकर यांची पालकमंत्री ना. दादा भुसे यांच्याकडे मागणी

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघात इगतपुरी तालुक्यातुन गेलेल्या समृद्धी महामार्गामध्ये स्थानिक शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमीनी संपादित झालेल्या आहेत. त्या सर्वांच्या विविध समस्या अद्यापही सुटलेल्या नसून समस्या जैसे थे आहेत. काही शेतकऱ्यांच्या महामार्गाच्या दोन्ही बाजुने शेतजमीनी असुन त्यांचे पूर्वापार वहिवाट रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी अरुंद व छोटे अंडरपास घेतल्याने शेतीमाल वाहतुक करण्यास अडथळा निर्माण होत आहे. यासह महामार्गाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रस्ता दिलेला नाही. अशा बिकट परिस्थितीत समृद्धीचा ‘भरवीर‌ ते नांदगाव सदो’ टप्पा कार्यान्वित करणे चुकीचे आहे. ह्या टप्प्याला सुरु करण्यापूर्वी संबंधित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडवाव्यात. त्यानंतरच समृद्धीचा टप्पा सुरु करावा अशी आग्रही मागणी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी नाशिकचे पालकमंत्री ना. दादा भुसे यांच्याकडे केली आहे. 

समृद्धी महामार्गाचे काम सुरु असतांना वापरलेले ग्रामीण रस्ते दुरुस्त करून देण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदार कंपनीची आहे. याबाबतची मागणी आमदार हिरामण खोसकर यांनी विधानसभा अधिवेशनात मांडलेली आहे. त्यानुसार शासनाने याबाबत यंत्रणेला सुचना दिलेल्या असूनही अद्याप सदर रस्ते दुरुस्त करण्यात आलेले नाही. ह्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे. महामार्गालगत शेतकऱ्यांच्या फुटलेल्या पाईपलाईनची भरपाई प्रलंबित आहे. स्थानिक व्यावसायिक, बिल्डींग मटेरियल सप्लायर्स लोकांची बिले, भाडेतत्वावर घेतलेल्या विविध वाहनांची बिले अद्याप मिळालेली नसल्याने बाधित नागरिकांनी उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. अशा स्थितीत स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आणि संबंधित नागरिकांचे प्रश्न आणि मागण्या सोडवल्यानंतरचा समृद्धीचा टप्पा खुला करण्यात यावा. ह्या टोलनाक्यावर स्थानिकांना प्राधान्याने नोकऱ्या द्याव्यात असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!