इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
शासकीय सेवा ही शासन आणि नागरिक यांच्यातील समन्वयाचा दुवा असून, नागरिकांना उत्तमसेवा व शासनाच्या सर्व योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचविणे हे आपले कर्तव्य आहे. याच कर्तव्य भावनेतुन यापुढेही नागरिकांना उत्तम सेवा देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी सूरज मांढरे आज यांनी दिली. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाप्रसंगी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, उपजिल्हाधिकारी ( प्रशासन ) भिमराज दराडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी नितिन मुंडावरे, गणेश मिसाळ, निलेश श्रींगी, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, विधी अधिकारी हेमंत नागरे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतांना गेले दोन वर्षापासून आपण कोरोना महामारीचा सामना करीत आहोत. कोरोनाच्या संकटाने देशाप्रतिची आस्था आणि आपल्या कर्तव्य या दोन्ही गोष्टीची जाणीव आपल्याला झाली. यातूनच आपल्याला आपले काम आजून चांगल्या पद्धतीने पुढे घेवून जायचे आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यातील वीरमाता व वीर पत्नी यांना आपण जमिनीचे वाटप केले असून, विविध शासकीय योजनांचा लाभही देण्याचे नियोजन केले आहे. असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी सांगितले.