इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
महाविद्यालयांनी गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करून दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी महाविद्यालयाला चांगले मानांकन मिळण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न आणि परिश्रम घ्यावे असे आवाहन पिंपळगाव बसवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. बी. शिंदे यांनी केले. इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शैक्षणिक व प्रशासकीय ऑडिट कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य डॉ. शिंदे बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, डॉ. किरण रकिबे, डॉ. अशोक बोऱ्हाडे, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, प्रा. एस. एस. परदेशी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. शिंदे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, उच्च शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्व पातळ्यांवरुन प्रयत्न होत आहे. महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजाचे देखील ऑडिट होणे गरजेचे आहे. प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी महाविद्यालयातील उपक्रमांचा आढावा घेऊन महाविद्यालयाच्या प्रगतीची माहिती दिली. याप्रसंगी डॉ. किरण रकिबे व डॉ. अशोक बोऱ्हाडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी केले. प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यू. एन. सांगळे यांनी तर आभार गुणवत्ता सेलचे समन्वयक प्रा. एस. एस. परदेशी यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व विभागातील प्राध्यापक उपस्थित होते.