पत्रकार लक्ष्मण सोनवणे यांना शासनाचा ‘आदर्श कृषी विस्तारक’ पुरस्कार घोषित : १० ते १४ फेब्रुवारीला नाशिकच्या कृषी महोत्सवात होणार वितरण

इगतपुरीनामा न्यूज – शेतीतील नाविन्याचा शोध घेत अनेक शेतकऱ्यांना तळमळीचे पत्रकार लक्ष्मण सोनवणे आधारस्तंभ ठरले. त्यांच्या विविध आदर्श कामांमुळे त्यांना शासनाचा ‘आदर्श कृषी विस्तारक’ पुरस्कार घोषित झाला आहे. १० ते १४ फेब्रुवारीला नाशिकला होणाऱ्या कृषी महोत्सवात पत्रकार लक्ष्मण सोनवणे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी दिली. अतिदुर्गम भागात तळागाळातील शेती व शेतकरी जिव्हाळ्याने जोपासून शेतकरी मित्र म्हणून लक्ष्मण सोनवणे सेवा देत आहे. विविध वृत्तपत्रातून शेतीचे प्रश्न, अडचणी, विकासाच्या बाबी, जलयुक्त शिवार अभियान, कृषी तंत्रज्ञान आत्माच्या योजना, उल्लेखनीय बाबी, प्रगतशील शेतकरी, नवनवीन प्रयोग यावरील विविध लेखांद्वारे त्यांनी मांडले आहेत. शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्यांनी केले. त्यामुळे शेतकरी ओसाड माळरानावर नवनवीन प्रयोग करीत आहेत. रेशीम शेतीद्वारे १०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी तुतीद्वारे उत्पादन सुरू केले. जलयुक्त शिवारच्या वृत्तामुळे जल पुनर्भरणाची कामे होऊन वनराई बंधारे, पाणी वापराबाबत जनजागृती घडत आहे. दुग्धव्यवसायाची भरभराट होत असून मोठ्या शहरात थेट दूध पाठवले जाते. प्रधानमंत्री पीक विमा संरक्षण, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कामधेनू दत्तक योजना, उन्नत शेती-समृद्ध शेती अभियान, पिकांवरील तण नियंत्रण जनजागृती, कृषी जागृती सप्ताह, आमचा गाव-आमचा विकास, वृक्ष लागवड, शेततळे, चारसूत्री भात लागवड, पीक स्पर्धा आदी बातम्यामुळे अनेक शेतकरी शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, आत्माचे निवृत्त प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, जि. प. कृषी विकास अधिकारी विजय धात्रक, इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माचे व्यवस्थापक हितेंद्र मोरे, कृषी पर्यवेक्षक किशोर भरते आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!