विनायकनगर येथे विजेचे खांब उन्मळून पडल्याने वीज खंडित

इगतपुरीनामा न्यूज, दि. १८ ( ज्ञानेश्वर महाले, त्र्यंबकेश्वर )

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विनायकनगर येथे गावातील विजेचे खांब उन्‍मळून पडल्‍याने २४ तासा पासून वीजपुरवठा खंडीत झाला आहे. विजेचे खांब सडल्यामुळे पडण्याच्या स्थितीत असल्याने ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ठराव करण्यात आला होता. त्र्यंबकेश्वर येथील वीज वितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. याची तपासणी कामी कोणी अधिकारी अथवा कर्मचारी आला नाही. विज वितरण अधिकाऱ्यांना लोकांच्या जीविताची किती काळजी असते यावरून दिसून येत आहे.
विनायकनगर येथे विजेचे पोल मुळापासून उन्‍मळून व तुटून पडले आहेत. यामुळे वीज वाहिन्‍यांच्‍या ताराही तुटल्‍या आहेत. भरवस्‍तीत वीजेचे पोल उन्‍मळून पडले आहेत. यामुळे गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. कर्मचाऱ्यांना तुटलेल्‍या तारा बाजूला काढून शेतकऱ्यांची अडचण दूर करावी लागणार आहे. या ठिकाणीही वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम कर्मचारी कधी हाती घेतात याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पेसा तालुका असूनही १०० % आदिवासी असलेल्या गावात संभाव्य घटनांची कल्पना वीज मंडळाला आधीच दिलेली होती. असे असूनही वीज वितरण अधिकाऱ्यांकडून काहीही उपाययोजना झाली नसल्याने दुर्घटना झाली. यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करून लवकरात लवकर वीज पोल दुरुस्तीचे कामे हाती घ्यावे.
- इंजि. रुपाजंली माळेकर, जिल्हा परिषद सदस्य, हरसूल

वीज पुरवठा सुरळीत करा

आज गावातील विजेचे पोल पडले. वीज पोल दुरुस्ती कामी ग्रामपंचायतीने ठराव करून त्र्यंबकेश्वर वीज कार्यालयात पाठविला होता परंतु यावर कोणत्याही कारवाई झाली नाही. तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
शरद महाले, माजी सरपंच गणेशगाव

 

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!