“बोलक्या बाहुल्या” करतात कोरोना विरुद्ध जनजागृती ; नलिनी आहिरे यांच्या अनोख्या प्रयोगाचा राज्यभर बोलबाला

इगतपुरीनामा न्यूज, दि. 27
विश्वात थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे सारे जगच त्रस्त झाले आहे. काळीज पिळवटून काढणाऱ्या पद्धतीने अगदी जवळचे माणसे मृत्युमुखी पडत आहे. सध्याच्या परिस्थितीत बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, इंजेक्शन सुद्धा मिळत नाही. मात्र कोरोना बाधितांची संख्या मात्र झपाट्याने वाढत आहे. ह्या विदारक पार्श्वभूमीवर कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी प्राथमिक शिक्षिका नलिनी आहिरे यांनी बोलक्या बाहुल्यांद्वारे मनोरंजनात्मक पद्धतीने जनजागृती सुरू केली आहे. प्राथमिक शाळा बाणगंगानगर ता. निफाड येथे त्या कार्यरत आहेत. त्यांच्या ह्या अनोखा प्रयोगाने राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकावला आहे.
कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी जनजागृती, रुग्णांनी घ्यावयाची काळजी, रुग्ण अत्यवस्थ कसा होतो याबाबत प्राथमिक शिक्षिका नलिनी आहिरे यांनी बोलक्या बाहुल्याद्वारे अनोख्या उपक्रमाची निर्मिती केलेली आहे. मनोरंजनात्मक तसेच जनजागृतीसाठी बहुमोल असे मार्गदर्शन सुद्धा ह्या प्रयोगातून त्या करत असतात.
त्यांच्या बोलक्या बाहुल्या जिवंत माणसांशी जनजागर करून मनोरंजन सुद्धा करतात. ह्या प्रयोगाची माहिती देताना नलिनी आहिरे म्हणाल्या की, मागील वर्षी जगभरात कोरोनाच्या थैमानाने अनेकांना गिळंकृत केले. आपण सारे मिळून या आलेल्या महामारीला, संकटाला खंबीरपणे तोंड देण्यासाठी एकवटून उभे राहूया. सर्वात प्रथम आपण सरकारच्या नियमांचे पालन करून एकजुटीने कोरोनावर मात करू.
नलिनी आहिरे पुढे सांगतात की,

कोविड रुग्ण कसा गंभीर होतो ?
■ पहिला दिवस – मला ताप आला, सर्दी झाली, अंग दुखतेय काही खास नाही. घरच्या घरी पॅरासिटॅमॉल किंवा सर्दीची औषधी घेतली जरा बर वाटलं.

■ दुसरा दिवस – थोडा खोकला आहे. एवढे काही नाही असा विचार परत घरच्याघरी औषधोपचार. मला बरं वाटतेय.

■ तिसरा, चौथा, पाचवा व सहावा दिवस – ताप आहे, खोकला आहे, अंग ही दुखत आहे. गावातील डॉक्टरकडे इलाजासाठी गेले. गावातील डॉक्टरने सलाईन लावले. तीन दिवस उपचार केले. पण खुपच थकवा येतोय, धाप लागतेय 2 दिवस अजुन कोविड सेन्टरकडे जायला वेळ घेतला. आता ऑक्सिजनची गरज पडायला लागली. पळापळ सुरु केली. बेड मिळेना. शेवटी कुठल्यातरी सेन्टरला बेड मिळाला.

■ नववा दिवस – सीटी स्कॅन केला, बल्ड टेस्ट केल्या, एचआरसीटी स्कोअर २५ पैकी १२ च्या वर आला. रक्तातील काही घटक कमी जास्त झाले. महागडी औषधे विकत घ्यावी लागले. व्हेटिलेटरचा खर्च वाढतो. येथुन सुरु होतो धोकादायक प्रवास. आठनऊ दिवसानंतर आपण स्वतःहुन आपल्या
शरीराची पूर्ण वाट लावून बसलेलो असतो. या परिस्थितीत ऑक्सिजन लेव्हल घटतच राहीली की पेशंट सिरियस होतो. डॉक्टरच्या हातातही आता जास्त काही राहत नाही. पेशंटचा खर्चही खुप झालेला असतो व तरीही जीवाची काही गॅरन्टी नसते. वाचलात तरी तुमचे फेफडे बऱ्याच अंशी कायमचे निकामी झालेले असतात.
म्हणुन पहिल्या दिवशीच लक्षणे दिसल्यास ताबडतोब आरटीपीसीआर टेस्ट करावी. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास नजीकच्या CCC, DCH मधे उपचारासाठी दाखल व्हावे. म्हणजे पेशंट सहजगत्या ८ ते १० दिवसात बरा होवुन आनंदाने घरी जावु शकतो.

नलिनी आहिरे ह्या वरील संवाद आपल्या बोलक्या बाहुल्यांद्वारे सादर करत असतात. त्या पुढे सांगतात की, आता निर्णय तुमचा आहे की आपणास आनंदाने घरी जायचे आहे की हॉस्पिटलमध्येच मरायचे आहे. या आधीही आपल्याकडे अनेक मोठी संकटे आली. पण आपल्या जनतेने धैर्याने नेहमीच विजय मिळविला आहे. आता पण नक्कीच ‘कोरोना महामारी’ ही लढाई जिंकणाच आहोत. ‘एकीचे बळ ही गोष्ट आपण जाणून आहोत. सर्व मिळून महाभयंकर संकटावर मात करू शकतो. कोरोना लढाई जिंकण्यासाठी सरकारला साथ द्यायचीच आहे. विनाकारण विषाची परीक्षा घेऊन आपले अनमोल जीवन धोक्यात घालण्यापेक्षा कुटुंबासह जनतेची काळजी घेऊ या.. जीव जर वाचला तर सगळे परत मिळवता येईल पण जीवनच  संपले तर सगळेच मार्ग बंद होतील. घरातील एक व्यक्ती गेली तरी सारे ठप्प होऊन बसते हे अनेकांनी अनुभवलेले आहे.
मंडळी कोरोनाची पहिली लाट आली. दुसरी लाट आली, तिसरी लाट येणार, येऊ द्या. पण आपण आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेऊ या. त्यासाठी सगळ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्या व आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. लस घेतल्यानंतर कोणताही त्रास होत नाही. तेव्हा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, स्वस्थ राहा भरत राहा. काळजी घ्या.
राज्यात उल्लेखनीय ठरलेल्या ह्या उपक्रमासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, संगीता महाजन, अधिव्याख्याता नाशिक डाएट, निफाडचे गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार, चौधरी मॅडम, विस्ताराधिकारी कैलास बोरसे, केंद्रप्रमुख नूतन पवार, शाळेचे मुख्याध्यापक संजय पवार, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते उपक्रमशील शिक्षक प्रमोद परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!