घोटीच्या १३ कोरोना रुग्णांना “त्रिमूर्ती” मुळे जीवदान

इगतपुरीनामा न्यूज, दि. 27
नाशिकसह राज्यभर जीवनदायी ऑक्सिजनची प्रचंड मागणी असूनही तेवढाच तुटवडा सुद्धा आहे. घोटी शहरातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. घोटी येथील साई कोविड हॉस्पिटलमध्ये 13 कोरोना बाधित ऑक्सिजनवर आहेत. त्यांच्यासाठी सोमवारी पूर्ण दिवसभर लागेल इतके ऑक्सिजन सिलेंडर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होते. मात्र त्यांनंतर काय ? असा प्रश्न हॉस्पिटलच्या संचालकांना पडला. लवकर ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी सर्वांनी जीवाचे रान करूनही यश मिळत नव्हते. ऑक्सिजन अभावी 13 कोरोना बाधित रुग्णांचा जीव टांगणीवर होता. याबाबत संचालकांनी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे यांच्याकडे माहिती देऊन रुग्णांचा जीव वाचवा अशी साद घातली. ह्या तिघा त्रिमूर्तींकडून तातडीने अत्यावश्यक असणाऱ्या ऑक्सिजनची उपलब्धता झाली. त्यामुळे 13 अत्यवस्थ रुग्णांचे बहुमोल प्राण वाचले आहेत. ह्या सर्वांचे इगतपुरी तालुक्यात विशेष कौतुक होत आहे.
13 अत्यवस्थ रुग्णांसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी 4 ऑक्सिजन सिलेंडर तातडीने मिळवून दिले. यासह त्यांनी आतापर्यंत साई कोविड हॉस्पीटलच्या रुग्णांसाठी 50 रेमडीसीविर इंजेक्शन मिळवून दिलेले आहेत. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदिप किर्वे यांनी इगतपूरी ग्रामीण रुग्णालयातून ऑक्सिजनचे 5 जम्बो सिलेंडर उपलब्ध करून दिले. इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, संदीप किर्वे यांनी शहापूर येथील एका ऑक्सीजन कारखान्यातून मध्यरात्री 30 ऑक्सिजन सिलेंडर मिळवून दिले. या त्रिमूर्तींकडून बहुमोल ऑक्सिजन मिळाल्याने अत्यवस्थ असणाऱ्या 13 रुग्णांचा जीव वाचवण्यास मदत झाली.
साई कोविड हॉस्पिटलचे संचालक डॉ. किरण काकडे, डॉ. महेंद्र शिरसाठ यांनी सांगितले की, तिघा देवदूतांकडून ऑक्सीजन उपलब्धतेसाठी मदत मिळाली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. तो अनर्थ त्रिमुर्तीच्या सहकार्याने टळला. साई कोविड हॉस्पिटल, रुग्णांचे नातेवाईक आणि इगतपुरी तालुक्यातर्फे तहसीलदार परमेश्वर कासुळे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, मनसे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे यांचे ऋणनिर्देश व्यक्त करण्यात आले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!