

इगतपुरीनामा न्यूज, दि. 27
इगतपुरी शहरासह संपूर्ण तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून वाढत्या कोरोनाच्या बाधितांच्या संख्येचा विस्फोट झाला आहे. तालुक्यातील आदिवासी भागातही रुग्णसंख्या वाढल्याने रुग्णांवरील उपचारासाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी वाढत असल्याने तालुक्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यातुनच खासदार हेमंत गोडसे यांनी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात स्वनिर्मित ऑक्सिजन युनिट उभारणीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस प्रशासनाने त्यांच्या सीएसआर फंडातून इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन युनिट उभारणीसाठी ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच ग्रामीण रुग्णालयात हे युनिट उभारण्यात येणार असल्यामुळे तालुक्यातील जनतेची उपचारासाठी गैरसोय दूर होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
गेल्या दोन महिन्यांपासून इगतपुरी तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे त्यामुळे खाजगी तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. रुग्णालयातील उपलब्ध बेड आणि येणारे रुग्ण यांच्या संख्येत मोठी तफावत असल्याने रुग्णालय प्रशासन मेटाकुटीला आले आहेत. अशातच ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेडची संख्या अत्यल्प असल्याने बाधित रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात अधिकचे ऑक्सिजन युनिट उभारावेत, यासाठी तालुक्यातील नागरिकांनी खासदार गोडसे यांची भेट घेवून मागणी केली होती.
इगतपुरी तालुका वासियांच्या मागणीची गंभीर दखल घेत खासदार गोडसे यांनी इंडियन सिक्युयिटी प्रेस कंपनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आपल्या प्रेसच्या सीएसआर फंडातून इगतपुरीसह परिसरातील रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालयात स्वनिर्मित ऑक्सिजन युनिट उभारणीची आग्रही मागणी केली होती. खा. गोडसे यांच्या मागणीची गंभीर दखल घेवून प्रेस प्रशासनाने त्यांच्या सीएसआर फंडातून इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन युनिट उभारणीसाठी तब्बल ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे यापुढील काळात आता इगतपुरीसह परिसरातील आदिवासी जनतेवरील उपचारासाठी ऑक्सिजनची सोय होणार आहे. ऑक्सिजन युनिट उभारणीसाठी ५० लाखांचा निधी मंजूर करुन आणल्याने तालुक्यातील रुग्णांनी व तसेच त्यांच्या नातेवाईकांनी खा. गोडसे यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत. याकामी प्रेसमधील मजदूर संघाचे कामगार नेते जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे यांच्यासह नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.