
इगतपुरीनामा न्यूज – ठाण्याहून शिर्डीला पालखी पदयात्रेत पायी जाणाऱ्या साई भक्तांना इगतपुरी तालुक्यातील घोटी जवळ देवळे गावामध्ये मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साई भक्ताचा चार्जिंगला लावलेला मोबाईल कोणीतरी चोरला म्हणून विचारपूस करण्यासाठी गेलेल्या महिला तसेच पुरुष साई भक्तांना मारहाण झाल्याचे समजते. या मारहाणीत एका साई भक्ताच्या डोक्याला जबर मार लागला आहे. दुसऱ्या साई भक्ताच्या डोक्यामध्ये चार ते पाच टाके पडल्याचे समोर येत आहे. जखमीमध्ये महिला आणि लहान मुलासह चार जणांना मारहाण झाली असून जखमी साई भक्तांना घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दहा ते बारा जणांच्या टोळक्याने मारल्याचा आरोप साई भक्तांनी केला आहे. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत