इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात घोटी खुर्द येथे अवकाळी वादळी पावसामुळे दगड मातीचे बांधकाम असलेले कौलारू घर पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत दुधाळ म्हैस जागीच ठार झाली असून अनेक पाळीव शेळ्या गंभीर जखमी झाल्या. घरात उभ्या केलेली मोटारसायकल पडलेल्या घरात दाबली गेल्याने त्याचेही मोठे नुकसान झाले. घरातील अन्न धान्य, संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. शंकर यशवंत निसरड हे दुर्दैवी घरमालकाचे नाव असून कुटुंबातील सर्वजण कामानिमित्त बाहेर असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांना सामाजिक कार्यकर्ते आत्माराम फोकणे यांनी माहिती दिली. श्री. बारवकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. यावेळी घोटी खुर्दचे सरपंच माणिक बिन्नोर, मंडळ अधिकारी सुयोग वाघमारे, तलाठी मनोज मोरे, कोतवाल तानाजी बर्डे, गोरख निसरड, गणपत म्हसळे आदी उपस्थित होते. संबंधित कुटुंबाला तातडीने आवश्यक ते सर्व साहाय्य द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आत्माराम फोकणे यांनी यावेळी केली. इगतपुरी तालुक्यात आज बेमोसमी पावसासह गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विजेच्या कडकडाटात वादळ आणि गारपीटसह जोरदार पाऊस पडला. यामुळे इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द भागातील भात, बागायती पिके, जनावरांचा साठवलेल्या चाऱ्याचे मोठे नुकसान झाले. पंचनाम्याचा केवळ फार्स न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आत्माराम फोकणे यांनी केली आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group