इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुका साहित्य मंडळाच्या वतीने उद्या २७ नोव्हेंबरला सोमवारी राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उदघाटन सकाळी १० वाजता संत साहित्याचे अभ्यासक व मुक्त पत्रकार डॉ. प्रशांत भरवीरकर यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून साहित्य अकादमी प्राप्त लेखक व ज्येष्ठ पत्रकार संजय वाघ यांची प्रमुख उपस्थिती राहील. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या संमेलनाचे हे २४ वे वर्ष आहे. तालुक्यासह नाशिकच्या विविध भागात यापूर्वी साहित्य संमेलन भरवले गेले आहेत. यावर्षी वाडीवऱ्हे येथील इंदुमती लॉन्स, पोलीस स्टेशन रोड येथे सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत हे संमेलन होणार आहे. भिमाबाई जोंधळे, अलका कुलकर्णी, अतुल अहिरे, अलका दराडे, सदानंद भटाटे, नरेंद्र पाटील, आशा पानसरे, आणि किरण फलटणकर या मान्यवरांना पुरस्काराचे वितरण यावेळी केले जाणार आहे. या संमेलनाला नाशिक जिल्ह्यातील सर्व साहित्यिकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन पुंजाजी मालुंजकर, ग्रंथ मित्र बाळासाहेब फलटणे, ॲड. ज्ञानेश्वर गुळवे, दत्तात्रय झनकर, हिरामण शिंदे, रवींद्र पाटील, सुदर्शन पाटील यांनी केले आहे.
प्रथम सत्र सकाळी ८.३० ला वाडीवऱ्हे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या ग्रंथ दिंडीने होणार आहे. सकाळी ९.३० ला सांस्कृतिक कार्यक्रम तर १० वाजता उदघाटन होणार होईल. यावेळी दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण होईल. प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश वसंत पाटील, मानवधनचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे, ज्येष्ठ साहित्यिक सावळीराम तिदमे, ऋता ठाकूर, प्रसिद्ध कवी तुकाराम धांडे, प्रा. आशा पाटील, प्रा. देविदास गिरी यांची उपस्थिती राहील. प्रास्ताविक इगतपुरी तालुका साहित्य मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर, सूत्रसंचालन कवी रवींद्र मालुंजकर, ॲड. ज्ञानेश्वर गुळवे करतील. यावेळी मधुकर गिरी यांच्या ‘वाघोबा’ या कथासंग्रहाचे प्रकाशन होईल. द्वितीय सत्रात दुपारी दोनला ग्रामीण साहित्यातील बदलते स्वरूप या विषयावर परिसंवाद होणार असून डॉ. विनोद गोरवाडकर अध्यक्षस्थानी असतील. यात विवेक उगलमुगले, सुनील गायकवाड, विजयकुमार मिठे, पुंजाजी मालुंजकर यांचा सहभाग राहील. तृतीय सत्रात दुपारी तीनला कवी माणिकराव गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली खुले कवी संमेलन होईल. सूत्रसंचालन जयश्री वाघ, अमोल चिनी करणार आहेत. सायंकाळी पाचला संमेलनाचा समारोप होणार असून यावेळी दत्तात्रय झनकर अध्यक्षस्थानी तर बाळासाहेब फलटणे, हिरामण शिंदे, रवींद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. कार्यक्रमाला सरपंच रोहिदास कातोरे, उपसरपंच प्रवीण मालुंजकर, समाज शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब सूर्यवंशी, प्रकाशक संघाचे जिल्हाध्यक्ष विलास पोतदार, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, प्रा. तुषार पाटील यांची विशेष उपस्थिती राहील.