“मिळून साऱ्याजणी…करू स्वयंपूर्णतेची पेरणी” : पाडळी देशमुखच्या मुद्रा महिला समुहाची स्वावलंबनाकडे वाटचाल

प्रभाकर आवारी, इगतपुरीनामा न्यूज, दि. १९

पाडळी देशमुख येथील मुद्रा स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी विश्वक्रर्मा दिनानिमित्त कल्पतरू फाउंडेशनच्या ६५० किलो रव्याच्या लाडुची मागणी पुर्ण केली. स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महिलांनीच घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक होत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती इगतपुरी यांच्या सहकार्याने मुद्रा गटाच्या महिला स्वयंसिद्धा होण्याकडे वाटचाल करीत आहेत.

पाडळी देशमुख येथील जेएमटी कंपनीच्या कल्पतरू फाउंडेशन दरवर्षी विश्वकर्मा दिनानिमित्त लाडुचे वाटप करत असते. यावर्षीही रव्याच्या लाडुचे वाटप करण्यासाठी ६५० किलो रव्याचे लाडु बनवण्याचा त्यांचा मानस होता. हे लाडु बनवण्यासाठी त्यांनी पाडळी देशमुख येथील मुद्रा स्वयंसहाय्यता महिला समूहाच्या अध्यक्षा शोभा महेश धांडे, सचिव ललिता बाळासाहेब आमले व सर्व महिला सदस्यांशी संपर्क करून याबाबत चर्चा केली. त्यानुसार मुद्रा स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांनी एकत्र येत ६५० किलो रव्याचे गोड, स्वादिष्ट गावठी तुपातील लाडु नियोजित वेळेच्या आधीच बनवुन कंपनीकडे सुपुर्द केले. यानिमित्ताने गटाने नव्या व्यवसायाची सुरवात केली आहे. पहिल्यांदाच मिळालेल्या या कामामुळे महिला खुश असून वेळेत लाडु बनवुन मिळाल्याने कल्पतरू फाउंडेशनचे पदाधिकारीही खुश झाले आहेत. आगामी काळात आणखीही कामे मुद्रा महिला समूहाला मिळणार आहेत.

मुद्रा महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या अध्यक्षा शोभा महेश धांडे, सचिव ललिता बाळासाहेब आमले, सदस्या मंदाबाई भास्कर धांडे, मीरा सोमनाथ चारस्कर, अलका धोंडीराम धांडे, बबाबाई मधुकर धांडे, संगीता संजय धोंगडे, योगिता दत्ता धोंगडे, मुक्ता पिलाजी धांडे, संगीता भास्कर घोडे, सविता दामोदर धांडे आदी महिलांनी जेएमसी कंपनीचे ( कल्पतरू फाउंडेशनच्या) व्यवस्थापक निळकंठेश्वर, बिरेंद्र रॉय, सागर पांडये यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून शासन प्रयत्नशील आहे. आमच्या समुहाला कल्पतरू फाउंडेशनकडून ६५० किलो लाडूंची मागणी आली. त्यामुळे सर्व महिलांनी या कामात आनंदाने सहभागी होऊन लाडूंची मागणी पूर्ण केली. काम मिळाल्याने महिला समूहाच्या सर्व महिलांनी आनंद व्यक्त केला. वेळेत मागणी पूर्ण केल्याने कल्पतरू फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांनीही समाधान व्यक्त केले.
- ललिता बाळासाहेब आमले, सचिव
मुद्रा स्वयंसहाय्यता महिला समुह, पाडळी देशमुख

Leave a Reply

error: Content is protected !!