
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्याचे खोटे आश्वासन देऊन निवडून येणारे लोकप्रतिनिधी निवडणुकीनंतर सर्वांना विसरून जातात. पिचलेल्या गांजलेल्या लोकांच्या मतांनी निवडून येऊनही त्यांना कर्तव्याचा विसर पडतो. आदिवासी समाजासाठी कोट्यावधी रुपयांच्या असलेल्या योजना, रस्ते जिथं काही गरजच नाही अशा ठिकाणी केल्या जातात. ज्या ठिकाणी खरी गरज आहे तिथं शासनाची योजना दुर्दैवाने पोहचत नाही. इगतपुरी तालुक्यातील खडकेद येथील भांगरेवाडी ह्या आदिवासी वस्तीची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. वाडीच्या जवळून पावसाळ्यात भरभरून वाहणारी कडवा नदी असून नदीच्या बाजूलाच भांगरेवाडी वसलेली आहे. जाण्यायेण्यासाठी अजिबात रस्ता नाही. पावसाळा आणि पाऊस आला की ही वाडी संपर्काच्या बाहेर जाते. इथल्या ७० वर्षीय वयोवृद्ध आजारी महिलेचा जीव वाचवण्यासाठी इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी चक्क पाठीवर घेऊन गुडघाभर पाण्यातून घोटीच्या एका रुग्णालयात दाखल केले. या कामासाठी गुणाजी खतेले, सोमनाथ खतेले या कार्यकर्त्यांनी कडवा नदी पार मोठी मदत केली. पार्वताबाई भाऊराव खतेले असे महिलेचे नाव असून गेल्या आठवड्यापासून आजारी असलेल्या या महिलेला उपचारासाठी संततधार पावसामुळे घोटीला नेता आले नाही. तिचा त्रास जास्तच वाढू लागल्याने दोन दिवसापूर्वी इंदोरे येथील एका डॉक्टरला ३ किमी डोंगर आणि चिखल तुडवत पायपीट करीत घरी उपचार करावे लागले होते. ह्या वाडीला रस्ता नसल्याने अशी भयानक परिस्थिती उद्वभवली आहे. पावसाळ्यात येथील ग्रामस्थांना मोठा धाक पडतो. इथल्या गरोदर महिलांना पावसाळ्यात बाळंतपणासाठी माहेरी किंवा ओळखीच्या नातेवाईकांकडे ठेवावे लागते. पार्वताबाई भांगरे यांच्या एका सुनेचे बाळंतपण होऊनही तिला रस्ता नसल्याने भांगरेवाडी येथे पावसामुळे आणता आलेले नाही. सून आणि नातवाला घरी आणण्यासाठी पावसाळा संपण्याची वाट बघावी लागणार आहे. लोकशाही व्यवस्थेत आरोग्य आणि उपचाराचा हक्क आणि मूलभूत सुविधाचा पण हक्क आहे. ह्याला भांगरेवाडीच्या व्यथेमुळे तिलांजली मिळाली असल्याचे आजच्या घटनेने सिद्ध झाले अशी प्रतिक्रिया गुणाजी खतेले यांनी दिली.