
इगतपुरीनामा न्यूज – दोन दिवसापूर्वी इगतपुरी तालुक्यात धामणी परिसरातील समृद्धी महामार्ग येथील ब्लास्टिंगच्या कामामुळे अनेक घरावर दगड उडाले होते. या घटनेत नऊ वर्षीय बालिका बचावली होती. यासह अनेक घरांना तडे गेले होते. त्याअनुषंगाने आज सायंकाळी सिन्नरचे मतदारसंघाचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी समृद्धी महामार्गाचे अधिकारी, ठेकेदार आणि ग्रामस्थांची बैठक इगतपुरी तहसील कार्यालयात घेतली. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना आठ दिवसाच्या आत योग्य ती नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. यापुढे कोणतीही ब्लास्टिंग करतांना तज्ञ समिती आणि इगतपुरी तालुका प्रशासनाच्या देखरेखीखाली ब्लास्टिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.