एकलव्य निवासी शाळेत कायम सामावून घेण्यासाठी शिक्षकांचे आमरण उपोषण सुरु

इगतपुरीनामा न्यूज – राज्यातील ३७ एकलव्य निवासी शाळेतील शिक्षकांना सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी या शाळेतील शिक्षक आज शिक्षक दिनापासून आपापल्या शाळेत आमरण उपोषणाला बसले आहेत. याबाबत आदिवासी विकासमंत्री ना. विजयकुमार गावित यांच्यासह प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि प्रकल्पाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. राज्यात ३९ एकलव्य निवासी शाळा सुरु असून सरळ सेवा भरतीद्वारे कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली होती. मात्र नियुक्ती आदेशात परीविक्षा कालावधी विलोपित होणे अपेक्षित होते. परंतु कामाचे मुल्यांकन अहवाल जाऊनही तो पूर्ण केला गेला नाही. परिविक्षा कालावधी विलोपित करून नियमित वेतनश्रेणी अद्याप पर्यंत लागू करण्यात आलेली नाही.

केंद्रीय जनजाती आदिवासी आयुक्त आणि नेस्ट यांनी आश्वासन देऊनही प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे सन २०१८ -१९ चे सर्व शिक्षक आजपासून आपल्या शाळेत कर्तव्यावर हजर राहून उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत परिविक्षाधीन कालावधी विलोपित होऊन नियमित वेतन श्रेणी लागू होत नाही तोवर आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे. इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो व टिटवे येथील एकलव्य निवासी शाळेतील शिक्षक उपोषणात सहभागी झाले आहेत. उपोषण काळात विद्यार्थ्यांना शिकविणार असल्याची माहिती यावेळी या शिक्षकांनी दिली. या ३७ शाळांमध्ये एकूण ४०६२ मुले तर ४०९० मुली अशा एकूण ८१५१ आदिवासी विद्यार्थी सीबीएससीचे शिक्षण घेत आहेत. आंदोलनातही विद्यार्थी हिताची काळजी घेणाऱ्या या शिक्षकांसंदर्भात शासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी टी. वाय. महाले, आर. एम. खत्री, आर. डी. राऊत, आर. वाय. महाले, एम. सी. पांडे, एस. डी. महाले, एस. जे. जाधव, पी. आर. तोडमल, डी. पी. भाकरे, जी. यु. काळे या आदी शिक्षकांनी केली आहे.

Similar Posts

error: Content is protected !!