
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळाला आहे. रात्री दहाच्या सुमारास बोरटेंभे येथील भानुदास नवले घरासमोरील अंगणात बिबट्या आला. ह्या बिबट्याला पाहून कुत्रे जोरात ओरडू लागल्याने नवले कुटुंबीयांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी तात्काळ घराचे पत्रे वाजवले असता बिबट्या पळून गेला मात्र पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास बिबट्या परत आला. त्याने पिंजऱ्यातील कुत्र्याला भक्ष बनविण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्रे परत जोरात भुंकू लागल्याने त्यांनी बाहेरील लाईट चालू केली. लाईट चालू झाल्यावर बिबट्याने धूम ठोकली. येताना आणि जाताना बिबट्याचा मुक्त वावर सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे. मात्र वनविभागाने त्यांच्याकडे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा उपलब्ध नसल्याचे सांगितले.