
इगतपुरीनामा न्यूज – शिक्षकांना ज्ञानदानाच्या पवित्र कामापासून वंचित ठेवून प्रचंड शैक्षणिक कामांचा बोजा लादला जातो. शिकवण्याच्या कामापासून दूर ठेवण्याचे शासनाचे धोरण आणि काही लोकप्रतिनिधी शिक्षकांबद्दल सोशल मीडियातून अवमानकारक वक्तव्य करतात याच्या निषेधार्थ आज आंदोलन झाले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते संभाजीराव थोरात व राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यात सर्व शिक्षकांनी शिक्षक दिनी काळ्याफिती लावून शासनाचा निषेध केला आहे.सततची ऑनलाईन कामे, नवनवीन उपक्रम, शाळाबाह्य अशैक्षणिक कामे शासनाकडून शिक्षकांवर लादली जात आहेत. त्यातच शिक्षक संख्या अपुरी असून सर्व क्षेत्रीय यंत्रणांचा कारभार हा प्रभारींच्या भरवशावर आहे. यामुळे सर्व राज्यभरातील शिक्षक वर्ग त्रस्त झाला आहे. सर्व अशैक्षणिक कामे बंद करून आम्हाला फक्त शिकवण्याचे काम करू द्या, विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आमच्या हातून घडूद्या यासाठी महाराष्ट्रातील तमाम शिक्षक शासनाचा आज निषेध करत आहे. राज्यातील काही लोकप्रतिनिधी शिक्षकांना मुख्यालय राहण्याच्या अट्टहासापाई वेठीस धरून शिक्षकांची अवहेलना करणारी वक्तव्य सोशल मीडियातून सतत करत आहेत त्याचाही आजच्या दिनी निषेध व्यक्त करण्यात आला. शिक्षकांच्या या आंदोलनाची दखल शासनाने न घेतल्यास १६ सप्टेंबरला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर राज्यभरातील शिक्षक मोर्चा काढतील असा इशारा शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक नेते संभाजी तात्या थोरात व राज्याध्यक्ष अंबादास वाजे, जिल्हाध्यक्ष बाजीराव सोनवणे, जिल्हा सरचिटणीस निवृत्ती नाठे यांनी दिला आहे