इगतपुरीनामा न्यूज, दि. १ – देशातील पौष्टिक तृणधान्यांमध्ये जगाची भूक, आरोग्य सुधारण्याची ताकद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व सांगितले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने पौष्टिक तृणधान्य लागवड आणि आहारात समावेश व्हावा, यासाठी हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार तालुका कृषी विभागातर्फे इगतपुरी तालुक्यातील भावली बुद्रुक येथे महिलांची तृणधान्य पाककला व चर्चासत्र संपन्न झाले. महिलानी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून तृणधान्यापासून विविध पदार्थ बनवले. नागलीचा शिरा, नागलीचे लाडू, बाजरीची उसळ,.वरई लाडू, वरई धिरडे, भगरीची इडली आदी पदार्थ लक्षवेधी ठरले. तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
मंडळ कृषी अधिकारी मनोज रोंगटे यांनी तृणधान्य कमी पाण्यात तग धरून राहणारे व कमी खर्चात उत्पादित होणारे पीक आहे. त्यांच्या पौष्टिक गुणधर्माचे आहारातील अनन्यसाधारण महत्त्व ग्रामस्थांना समजावून सांगितले. कृषी पर्यवेक्षक अनिल मुजगुडे यांनी तृणधान्य प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक हर्षला गिळंदे यांनी तृणधान्यापासून बनवता येणाऱ्या विविध पाककृती बाबत माहिती दिली.कार्यक्रमाचे आयोजन कृषी सहाय्यक मंगेश कोकतारे यांनी केले. यावेळी कृषी विभागाचे कर्मचारी व सरपंच,कृषी मित्र व भावली बुद्रुक गावातील शेतकरी उपस्थित होते.