आदिवासी न्याय हक्काच्या लढाईचे शिलेदार भगवान मधे यांना जनसेवा प्रतिष्ठानचा “स्वामी गौरव” पुरस्कार घोषित : संस्थापक अध्यक्ष किरण फलटणकर यांनी केली घोषणा

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथील जनसेवा प्रतिष्ठानतर्फे एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान रामा मधे यांना मानाचा स्वामी गौरव पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. गुरुवारी २४ ऑगस्टला इगतपुरी येथील आर. जी. चांडक माहेश्वरी मंगल कार्यालयात दुपारी २ वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरण फलटणकर यांनी दिली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावी हर्ष ह्या दुर्गम आदिवासी भागातून गेल्या २ दशकांपासून भगवान मधे सक्रिय कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात एल्गार कष्टकरी संघटनेच्या माध्यमातून ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करीत आहेत. गेल्या २१ वर्षांमध्ये अनेक चढ-उतार, तुरुंगवास, २ वेळा हल्ले होऊनही लढवय्या भगवान मधे कधी डगमगले नाही. ग्रामीण आदिवासी भागामध्ये मूलभूत सुख सुविधा पोहोचवण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव होऊनही भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेली समाज व्यवस्था शासन करू निर्माण करू शकले  नाही. ग्रामीण भागामध्ये आदिवासींना त्यांच्या  हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागते. याचे नेतृत्व करून भगवान मधे यांनी स्वतःच्या अंगावर समाजासाठी केसेस घेतलेल्या आहेत.

इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, सिन्नर या तालुक्यामध्ये आदिवासी व इतर मागास कष्टकरी, शोषित, वंचित, दुर्बल महिला विद्यार्थी या घटकांसाठी त्यांचे काम सुरु आहे. आदिवासींमध्ये असलेल्या विविध अंधश्रद्धा समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी झपाटून काम केले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके हर्ष असे येथील २०१४ मध्ये घडलेल्या नरबळी हत्याकांडाला दोन महिन्यानंतर त्यांनी वाचा फोडली होती. स्वतःच्या मुलाने जन्म देणाऱ्या आईचा नरबळी दिल्याची ही घटना संपूर्ण देशभरात गाजली होती. त्यामध्ये ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. त्या काळात भगवान मधे यांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागले. बालविवाह आणि अनिष्ट रूढी परंपरा याबाबत जागृतीचे काम त्यांनी केले आहे. आदिम आदिवासी जनतेचे प्रश्न, पाणीटंचाई, नागरी सुविधा यावर आवाज उठवला तर स्थानिक पुढारी, लोकप्रतिनिधी आदींच्या रोषाला सामोरे जाऊनही त्यांचे कार्य पुढे सुरु आहे. २००२ मध्ये भगवान मधे वावी हर्ष ग्रामपंचायतीचे सरपंच असतांना गावात ५ वी पर्यंत शाळा होती. सरपंच झाल्यावर त्यांनी गावात माध्यमिक शाळा आणली. प्रत्येक कुटुंबात बारावीच्या पुढील शिक्षण घेणारी पिढी पाहता भगवान मधे यांनी सरपंचपद सार्थ ठरवले. आजही आदिवासी बांधव न्याय सन्मान यापासून कोसो दूर असून आदिवासी, गरीब, कष्टकरी, शोषित, दुर्बल घटक यांना अद्याप खरे स्वातंत्र्य मिळणे बाकी आहे. ह्या दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई  मी व माझी एल्गार कष्टकरी संघटना लढत आहोत अशी प्रतिक्रिया भगवान मधे यांनी दिली.

Similar Posts

error: Content is protected !!