संस्कार, संस्कृती आणि संतत्वामध्ये आयुष्य जगलेले आधुनिक संत वैकुंठवासी हभप रुंजाबाबा गुळवे

लेखन : भास्कर सोनवणे, संपादक

महाराष्ट्राला लाभलेली वारकरी संप्रदायाची परंपरा अखंडित ठेवण्याचे काम आधुनिक काळातील संतस्वरूप महात्मे करीत असतात. पांडुरंग परमात्म्याची सेवा करतांना तोच विठोबा प्रत्येक जीवामध्ये शोधण्याचे कसब सुद्धा ह्याच साधकांकडून होते. वाया जाऊ देऊ नये एक क्षण.. भक्तीचे लक्षण जाणावे हे याप्रमाणे जीवनातील प्रत्येक मिनिट हरिभक्ती करणारे विरळेच.. इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथील वैकुंठवासी हभप रुंजाबाबा गुळवे यांचे अलौकिक कार्य आधुनिक संताप्रमाणे होते. २९ जानेवारीला ह्या महात्म्याने आपला देह पांडुरंगमय केला. तुकोबाची गाथा, ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी, सर्व संतांचे हरिपाठ आणि जीवनाचे सार रक्ताच्या प्रत्येक थेंबात पसरलेले हिमालयाच्या उंचीचे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. महाराष्ट्रात वारकरी महात्मे आणि सामान्य वारकऱ्यांना बेलगाव कुऱ्हे ह्या गावाचे नाव सांगताच हभप रुंजाबाबा गुळवे यांच्याबद्धल भरभरून ऐकायला मिळायचे. आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्यांनी केलेली तपश्चर्या त्यांना निश्चितच चार मुक्ती दिल्याशिवाय राहणार नाही. देवा तू मला मनुष्य जन्म दिला हे तुझे माझ्यावर फार मोठे उपकार आहेत. त्यासाठी तुझा उतराइ होण्याकरता मी तुझा दास झालो आहे. परंतु केवळ तुझा दास झालो असे म्हटल्यावर मी तुझा उतराइ कसा झालो हे वर्म मला काही कळाले नाही, जो मार्ग पुढे नीट आहे तोच मार्ग मला दाखव. भक्त पणाचे रक्षण तुम्हीच करा आणि दोन्ही पक्ष तुम्हीच चालवत आहात असे तुम्ही समजा. अहो देवा तुम्हाला शरण आलेल्या भक्तांचा तुम्ही अभिमान धरता कारण तुम्हाला तुमचे दीनानाथ, पतित-पावन हे ब्रीद सांभाळायचे आहे व त्याचे तुम्हाला रक्षण करायचे आहे म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी फार काही जाणत नाही पण माझ्या उद्धारा संबंधीचा विचार तुम्हाला मी स्पष्ट करून सांगितलेला आहे. याप्रमाणे पांडुरंगाला प्रार्थना करण्याचे काम बाबांनी नेहमी केले.

वै. रुंजाबाबा गुळवे यांच्या सानिध्यात मला राहायला मिळाले हे माझे परमभाग्य आहे. ते नेहमी म्हणायचे आपल्याला चांगला मनुष्य देह मिळाला आहे तो असाच वाया जाऊ देणे चांगले आहे काय ? आपल्याजवळ देवाच्या सेवेचे काहीतरी ऋण असू द्यावे. असे केल्याने केव्हातरी हरी आपल्याला भेट देईल. कारण आपल्या माथ्यावर त्याच्या सेवेचा भार आहे, त्या देवाची नितांत सेवा केल्याने शंभर जन्माच्या शेवटी का होईना पण कृपाळू देवाला आपल्या विषयी कृपा होईल.
पवित्र होईन चरित्र उच्चारें । रूपाच्या आधारें गोजिरिया ॥१॥
आपुरती बुद्धि पुण्य नाहीं गांठी । पायीं घालीं मिठी पाहें डोळां ॥ध्रु.॥
गाईन ओविया शिष्टांच्या आधारें । सारीन विचारें आयुष्या या ॥२॥
तुका म्हणे तुझें नाम नारायणा । ठेवीन मी मना आपुलिया ॥३॥
वरील अभंगावर एकदा निघालेली चर्चा सांगतांना त्यांनी त्यावर अतिशय समर्पक अशी माहिती मला चांगली आठवते. देवा मी तुमचे चरित्र उच्चार करीन आणि तुझ्या गोजिऱ्या रूपात च्या आधारे पवित्र होईन. देवा माझी बुद्धी अपुरी आहे आणि म्हणावे एवढे पुण्यही माझ्याकडे नाही. त्यामुळे मी तुझ्या पायाला सारखी सारखी मिठी मारत आहे आणि तुझे रूप माझ्या डोळ्याने पाहात आहे. हरीचे गुणगान श्रेष्ठ संतांच्या आधारेच गायिन आणि माझे पुढील आयुष्य त्यांच्या विचारानेच व्यतीत करीन. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा मी तुझे नाम माझ्या मनामध्ये सतत ठेवीन
उद्धरीले कूळ आपण तरला । पूर्ण तोचि झाला त्र्यैलोक्यात ॥ १॥
त्र्यैलोक्यात झाले द्वैतची निमाले । ऐसे साधियेले साधन बरवें ॥ २॥
बरवें साधन सुखशांति मना । क्रोध नाही जना तीळभरी ॥ ३॥
तीळभरी नाही चित्तासी तो मळ । तुका म्हणे जळ गंगेचे
तुकोबांच्या ह्या अभंगानुसार वैकुंठवासी हभप रुंजाबाबा गुळवे हे जगले. ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत आदी पवित्र ग्रंथाचे उपासक, वारकरी वैभव, कीर्तन मर्मज्ञ, चिकित्सक, भजनानंदी व्यक्तिमत्व आणि कीर्तन, भजन,  प्रवचन, कथा हाच जीवनाचा भाग असणाऱ्या बाबांचा दशक्रिया विधी मंगळवारी ७ फेब्रुवारीला होत आहे. संस्कार, संस्कृती आणि संतत्वामध्ये आयुष्य जगलेले आधुनिक संत वैकुंठवासी हभप रुंजाबाबा गुळवे यांना पांडुरंगचरणी स्थान मिळो ही भावपूर्ण आदरांजली.

Similar Posts

error: Content is protected !!