महिमा देवीचा.. नवसाला पावणारी घाटनदेवी

इगतपुरीनामा न्यूज, ता. ०७ : निसर्गसौंदर्याने नटलेल्या इगतपुरी शहरालगत घाटनदेवी मातेचे मंदिर आहे. इगतपुरी शहर सोडल्यानंतर कसारा घाटाच्या प्रारंभीच घाटनदेवी मातेचे शिवकालीन प्राचीन मंदिर आहे. घाटात देवीचे स्थान असल्याने घाटनदेवी माता म्हणून हे स्थळ प्रसिद्ध झाले आहे. घाटनदेवीचे रूप अत्यंत विराट आहे. संकटसमयी भक्तांच्या मदतीला धावणारी व नवसाला पावणारी म्हणून तिचा महिमा आहे.

घाटनदेवी मातेच्या श्रीदुर्गा सप्तशतीमध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघाटा, स्कंदमाता, महागौरी व रिद्धी सिद्धी अशी विविध रूपे आहेत. यातील पहिले रूप म्हणजे शैलपुत्री तथा घाटनदेवी माता होय. वज्रेश्वरीहून भीमाशंकरकडे प्रयाण करीत असताना देवी येथे विश्रांतीसाठी थांबली. नैसर्गिक वातावरण आणि सुंदर परिसराने मोहित होऊन देवीने येथे मुक्काम केला, अशी पुराणात कथा आहे. या मंदिरासमोरच उंटदरी नावाचे सृष्टीसौंदर्याने नटलेले निसर्गरम्य ऐतिहासिक स्थान आहे. कल्याणचा खजिना लुटून उंट याच दरीत लोटले गेले म्हणूनच उंटदरी नाव पडले आहे. त्याचा अपभ्रंश उटदरी असा झाल्याचे इतिहासात नमूद आहे.

जव्हारकडून पुण्याकडे मावळ प्रांतात जाणारा अतिदुर्गम रस्ता याच उंटदरीतून होता. भातसा नदीचा उगम याच दरीत झाला. उंटदरीपासून जवळच असणाऱ्या घाटनदेवी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज कल्याणमार्गे थळ घाटात आले होते. त्या काळात शिवाजी महाराज यांनी मावळ्यांसह घाटनदेवीची यथासांग पूजा-अर्चा करून देवीचे दर्शन घेतल्याची नोंद इतिहासात आहे. देवीचे लोभस आणि तेजस्वी रूप आजही भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रस्थान आहे. वाघावर रूढ असलेली माता सर्वच भक्तांना प्रसन्न मुद्रेने आशीर्वाद देऊन पुढील प्रवास सुखाचा होवो, याचे वरदान देते.

मंदिराचा जीर्णोद्धार आणि शाश्वत स्थापना वैदिक काळापासून देवीची येथे स्थापना झाल्याचे नमूद आहे. घाटनदेवी पूर्वी जुन्या ठिकाणी दगडी मनोऱ्यावर होती. मनोरा जसा होता, तसाच आजही कायम आहे. मात्र पूर्वापार असलेले जीर्ण मंदिर पडून गेल्याने गावातील भाविकांनी नव्या मंदिराच्या ठिकाणी मूर्तीची स्थापना केली. ता. २१ एप्रिल १९८० ला देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना समाजसेवक ब्रिजलाल रावत यांच्या हस्ते करण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या काळात येथे अहमदनगर, राजूर अकोले, जव्हार, मोखाडा, ठाणे, कल्याण, मुंबई आदी भागातून मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!