
इगतपुरीनामा न्यूज – शालेय विद्यार्थ्यांनी आतापासूनच आपल्या आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर करून आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढवावी असे प्रतिपादन इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी केले. तालुका कृषी अधिकारी कार्यालय इगतपुरी यांच्यामार्फत तालुक्यातील विविध शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्याविषयी जागृती करण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत बारशिंगवे, वासाळी येथील शाळेत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. बारशिंगवे ता. इगतपुरी येथे जनता विद्यालय, वासाळी येथील माध्यमिक विद्यालयात पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक तृणधान्याबाबत जागृती निर्माण करणे तसेच तृणधान्याबाबत प्रसिद्धी करणेबाबत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी मार्गदर्शन करून आहारातील पौष्टिक तृणधान्याची गरज याचे महत्त्व विशद केले. कृषि पर्यवेक्षक किशोर भरते यांनी तृणधान्याचे देशस्तरावर होत असलेल्या क्षेत्र वाढीचे व प्रसाराचे कार्य सांगितले. कृषी सहाय्यक विजय कापसे यांनी विविध प्रकारच्या तृणधान्याची माहिती देऊन त्यांचे फायदे सांगितले. उपसरपंच पोपट लहामगे, मुख्याध्यापक राजेंद्र पवार, माजी सरपंच काशिनाथ कोरडे, सूर्यकांत सोनवणे, कृषी सहाय्यक शांताराम गभाले व देवेंद्र पाटील उपस्थित होते.